भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती |
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना || १ ||

महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे |
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णवगायका || २ ||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळ देवता हंता भव्यसिंदूरलेपना ||३ ||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका || ४ ||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे |
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ||५ ||

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें || ६ ||

पुच्छ ते मूरडिले माथा किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा || ७ ||

ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू |
चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी ||८ ||

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे ||९ ||

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे || १० ||

अणूपासूनि ब्रह्माण्डा एवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे मेरुमंदार धाकुटे ||११||

ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके |
तयासी तुळणा कैची ब्रह्माण्डी पाहता नसे || १२ ||

आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा || १३ ||

भूत प्रेत समंधादि रोग व्याधी समस्तही |
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने || १४ ||

हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भली |
दृढ देहो नि:संदेहो संख्या चंद्रकळा गुणे || १५ ||

रामदासी अग्रगण्यू कपिकूळासि मंडणू |
रामरूप अंतरात्मा दर्शने दोष नासती || १६ ||