डोळा हा गाळोनी साधिले अंजन |
निजी निजधन प्राप्त झाले || १ ||

पायाळाचे दिले बळीदान अंग |
अंगी अंगसंग संगावीण || २ |

लाभ ना अलाभ वृत्ति ना निवृत्ति |
शुद्धबुद्ध ज्ञप्ति मावळली || ३ ||

आकाश हरपले चिद्रूप संचले |
सूर्यावीण पाहले सदोदित || ४ ||

शब्दार्थ ----

अंजन – चूक लक्षात आणून देणे , दृष्टी सुधारणे

भावार्थ ---


श्रीसमर्थांचे हे ४ ओळींचे संख्येने लहान पण बोध महान असलेले भारुड आहे. सामान्यपणे माणसाची बुद्धी देहकेंद्रित असल्यामुळे त्या देहकेंद्रित बुद्धीला आत्मकेंद्रित करण्यासाठी सद्गुरु कडून आत्मज्ञानाचा बोध प्राप्त करावा लागतो. अध्यात्मात सद्गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे. आपल्या डोळ्याला जे समोरचे मिथ्या जग दिसते त्यात प्रतिक्षण परिवर्तन होत असते . आणि ते बदललेले परिवर्तन पण सतत दीर्घकाल पर्यन्त न टिकणारे असते. म्हणून सद्गुरू आपल्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालून , देश काल वस्तु यांचा त्रिविधभेद नाहीसा करुन , द्वैत अद्वैत याच्याही पलीकडे असलेले परमात्मस्वरुप आपल्याला दाखवून सर्व कांही ब्रह्मच या महावाक्याचा अनुभव प्राप्त करुन देतात . मनोबोधात श्रीसमर्थ म्हणतात “ गुरु अंजनेवीण तें आकळेना | ” ( १४१) . तर तुकाराम महाराज म्हणतात “ रवि दीप हिरा दाविती देखणे / अदृश्य दर्शने संतांचेनी // ” ( गाथा ) सद्गुरूकृपेने आपली जुनी ठेव , आपले निजधन आपले आत्मस्वरुप याची प्राप्ति आपल्याला होते. त्यासाठी आधी सदगुरुच्या संगतीत राहून आपल्या अहंकाराचे बलिदान द्यावे लागते. सद्गुरुच्या संगाने सत्संगाने मनाची लाभ - हानी फायदा - तोटा पाहून काम करण्याची स्वार्थी वृत्ती नष्ट होते. अंगी विवेक वाढून वैराग्य येते. मनाच्या सर्व चित्तवृत्ती निवृत्त होऊन शांत होतात. त्यामुळे बुद्धी शुद्ध होते. मीपणाची जाणीव ज्ञप्ति मावळून जाते , नाहीशी होते. वाणी परावाणीत स्थिरावते . मौन होते. हृदयात चिद्रूप साकारु लागते. चिद्रूप – चित् रूप . चित् म्हणजे ज्ञ – शक्तियुक्त अंतःकरणात दिव्य ज्ञानाची ज्योत दिसू लागते . सूर्यावीणा म्हणजे सूर्य नसतानाही अर्थात डोळे बंद असतानाही ध्यानात डोळ्यासमोर ती तेवत असलेली दिव्यज्योत अखंड दिसू लागते. अनाहत नाद कानी येऊ लागतो. श्रीरामदास स्वामी म्हणतात मन चित्त , पुन्हापुन्हा त्याच आत्मस्वरुपाच्या दिव्यज्योतीत आणि अनाहत नादात लीन होऊन त्याच जागी त्याच ठिकाणी कायम स्वरूपी स्थिरावते . तिथेच वस्ति करते .