अनीती अविवेकी अन्यायी |अभक्त अधम लंडाई |
वेदशास्त्र करील काई |तया मूर्खासी ||१||
कर्माच्या ठाईं अनादर |नाहीं सगुणसाक्षात्कार |
ज्ञान पहातां अंधार |निश्चय नाहीं ||२||
उग्याच गोष्टी ऐकिल्या |मना आल्या त्या धरिल्या |
रत्नें सोडून एकवटिल्या |शुभा जैशा ||३||
फाल्गुनमासींचा खेळ |जैसा अवघा बाश्कळ |
तेथें पाहोनि निर्मळ |काय घ्यावें ||४||
प्रत्ययज्ञानेंविण |करी अनुमानाचा शिण |
शत्रु आपणासी आपण |होऊन राहे ||५||
त्यासी कोणें उमजवावें |मानेल तिकडें न्यावें |
आंधळें गुरूं स्वभावें |धांवे चहूंकडे ||६||
जिकडे तिकडे ज्ञान जालें |उदंड गेसावी उतले |
तयांचे संगतीं जालें |बाष्कळ प्राणी ||७||
भ्रष्ट ओंगळ अनाचारी |कुकर्मी अनुपकारी |
विचार नाहीं अविचारी |जेथें तेथें ||८||
गर्भांधा कैंची परीक्षा |दीक्षाहीनासी दीक्षा |
प्रमाण मानीं प्रत्यक्षा |विवेकहीन ||९||
कशापासून काय जालें |ब्रह्मांड कोणें निर्मिलें |
कांहीं न कळतां भुंकलें |गाढव जैसें ||१०||
जें वेदशास्त्रीं मिळेना |अध्यात्म कांहीं कळेना |
माजला बोका आकळेना |रेडा जैसा ||११||
कोण दीक्षा आहे कैसी |विवेक स्थिती ऐशी |
न पाहतां वसवसी |श्वान जैसें ||१२||
ऐसे प्रकारींचें जन |चित्तीं अवघा अनुमान |
प्रतीतीवीण ज्ञान |उगेंच बोले ||१३||
लक्षण नेणे अवलक्षण |भाग्य नेणे करंटपण |
ज्ञान नेणे अज्ञान |परम अन्यायी ||१४||
एक उपदेश घेती |देवतार्चन टाकून देती |
धर्मनीति बुडविती |महापाषांडी ||१५||
म्हणती आमुचा गुरु |तयाचा अगाध विचारू |
तेथें अवघा एकंकारू |भेद नाहीं ||१६||
एक म्हणती गुरु आमुचा |करी अंगिकार विष्ठेचा |
तयासारिखा दुजा कैंचा |भूमंडळीं ||१७||
एक म्हणती एकचि तो |अखंड ओक वर्पितो |
बरें वाईट पाहे तो |गोसावी कैंचा ||१८||
अंगिकार करी सौख्याचा |तो गोसावी कशाचा |
पहा गोसावी आमुचा |गुखाडींत लोळे ||१९||
वोक नरक आणि मूत |निःशंक घटघटा घेत |
लोकांमध्यें मोठा महंत |तया म्हणावें ||२०||
वोंगळपणाची स्थिती |स्वयें ओंगळ करीती |
शुचिष्मंत महापंडितीं |मानिजेना ||२१||
बरें जैसें जैसें मानलें |तैसें तैसें घेतलें |
येथें आमुचें काय गेलें |होइना कां ||२२||
एक म्हणती अर्गळा |भूताळा आणि देवताळा |
जनांमध्यें आग्या वेगळा |चेतऊं जाणें ||२३||
म्हणती आमुचा गुरु |जाणे चेटकाचा विचारू |
भूतें घालून संहारूं |समर्थ असे ||२४||
म्हणती आमुच्या घरीं |मोठी विद्या पंचाक्षरी |
चेडे चेटके नानापरी |लोकांमध्यें ||२५||
अखंड राहे स्मशानीं |सटवी मेसको मायराणी |
नाना कुयंत्रें येथुनि |शिकोनि जावीं ||२६||
एक म्हणती गोसावी |गारुड्यास वेड लावी |
त्यांचे सर्पचि पळवी |चहूंकडे ||२७||
कुसळी विद्या दृष्टीबंधन |तत्काळ सभामोहन |
उच्चाटण आणि खिळण |मोहिनी विद्या ||२८||
आमुचे गोसावी महायोगी |औषधें देती जगालागीं |
नपुंसक वनिता भोगी |चमत्कारें ||२९||
आमुचे गोसावी साक्षेपें |अखंड करिती सोनें रुपें |
अंजन साधन त्यापें |काय उणें ||३०||
मोठा बडिवार गुरूचा |विंचू उतरी ठाईंचा |
तैसाचि उतार सर्पाचा |ठाईंचा होय ||३१||
जंबुक मूषकें खिळवी |चोरटीं करावीं वोणवीं |
अखंड भूतें राबवावीं |नाना जिनसी ||३२||
आमुचा गुरु गुप्त होतो |दुजे दिवशी उमटतो |
अचेतन चालवितो |मोठा ज्ञानी ||३३||
व्याघ्रावरी निःशंक |हातीं सर्पाचा चाबुक |
वांचले होते सहस्र एक |सामर्थ्यबळें ||३४||
दांत पाडोनि निघाले |पांढरे केश काळे जाले |
किती आले आणि गेले |गोसाव्या देखतां ||३५||
धारबंद नजरबंद |नाना घुटके काम बंद |
पारे मोहरे नाना बंद |नाना प्रकारें ||३६||
अग्नीमध्यें परी जळेना |लोकांमध्यें परी कळेना |
देखतां देखतां अस्माना |वेंधून जाय ||३७||
जाणे दुसर्याचे जीवींचें |वांझपण फेडिलें वांझेचें |
मन विघडी दांपत्याचें |एकही करी ||३८||
त्याचें मोठे नवल कीं गा |मृत्तिकेच्या करी लवंगा |
ब्राह्मण समंध अंगा |आणून दावी ||३९||
मातीची साखर केवळ |ढेंकळाचा करी गूळ |
धोत्र्यांच्या बोंडांची केवळ |वाळकें करी ||४०||
श्वास कोंडी दिशा कोंडी |पाडी तिडकेनें मुरकुंडी |
धडा मानसाची मान वांकडी |करून मोडी ||४१||
ऐशापरीच्या करामती |भोंपळे पोटांत चढविती |
मनुष्याचें पशु करिती |निमिषमात्रें ||४२||
गुरु भविष्य सांगती |रेड्याकरवीं वेद म्हणविती |
गधड्याकरवीं पुराणें सांगविती |सामर्थ्यबळें ||४३||
ुकुतर्याकरवीं रागोद्धार |कोंबड्याकरवीं तत्वविचार |
खेचर आणि भूचर |सकळ बाधी ||४४||
घुटका घटकेनें करावा |फुटका कवडा वेचों न द्यावा |
उदंड बचनाग साधावा |एकाएकीं ||४५||
वाळलीं काष्ठें हिरवाळलीं |आंधळीं डोळसें जालीं |
पांगुळें धांवों लागलीं |चहूंकडे ||४६||
गर्भिणीस कन्या कीं पुत्र |हें ठाउकें आहे यंत्र |
गोसाव्यांनीं विद्या मात्र |अभ्यासिली ||४७||
भांडविद्या अभ्यासिली |तस्करविद्या कळों आली |
विचारें पाहिली |वसुंधरा ||४८||
आमुचा गुरु अधिक गुणें |डोईचें करी रांधणें |
लोकांचें नवस पुरवणें |नाना प्रकारें ||४९||
मेले प्राणी उठविलें |साकरेचें मीठ केलें |
गटगटा अग्नीस गिळिलें |काय सांगों ||५०||
गोसावी समाधी बैसला |दुसरे वेळे उघडून पाहिला |
पूर्वेचा पश्चिमेस गेला |अकस्मात ||५१||
लिंगाचे तुकडे तोडिती |कोटिलिंगें एकचि करिती |
मोजवून दाळी चारिती |पाषाणनंदी ||५२||
आसन घातलें जळावरी |पाहतां तो पैलतिरीं |
आमुचा गुरु समुद्रावरी |चालत जातो ||५३||
पुरुषाची करी वनिता |वनितेचा पुरुष मागुता |
अन्न खाऊन तत्वतां |दिशां नाहीं ||५४||
नानाजिनसी अन्न खाणें |परी उदक नाहीं घेणें |
शापून भस्मचि करणें |ऐशा गुरु ||५५||
अन्न उदंडचि खाणें |किंवा उपवास करणें |
गोमुखतोंडें जेवणें |यथासांग ||५६||
गुरु वाघासी भेटला |वाघें चरचरां चाटिला |
वस्त्रें बाधोनि आणिला |घरास वाघ ||५७||
गोसावी वाघ होतो |दुसर्या वाघासी मारितो |
भुंक भुंकोचि मरतो |उतार नाहीं ||५८||
साधी बाळंतिणीची खापरी |मोहरे साधी नानापरी |
तूप घे घागरीच्या घागरी |गुरु आमुचा ||५९||
मेल्या माशा उठविती |तुळसी देवावरी पाडिती |
ऐशा नाना करामती |भूमंडळीं ||६०||
आमुच्या गुरूची मोठी महंती |नाना अभक्ष भक्षिती |
लोकांदेखतां फुलें करिती |मद्यमांसाची ||६१||
एक गोसावी पृथ्वीवरी |त्याची कोणी न पवे सरी |
जेथें बैसे तेथें बोहरी |करी सावकाश ||६२||
एक गोसावी महा भला |पोरीं वाळवंटीं पुरिला |
एक तो पडोनिच राहिला |कित्येक दिवस ||६३||
एक गोसावी भाग्य देता | एक गोसावी पुत्र देती |
गोसाव्यानें नवस चालती |नाना प्रकारें ||६४||
जें जें मनामध्यें चितावें |तें तें गोसाव्यांनीं जाणावें |
चुकलें ठेंवणें काढून द्यावें |नानाप्रकारें ||६५||
सुडक्यामध्यें लाह्या भाजिती |थोड्या द्रव्याचें उदंड करिती |
पराचीं खबुत्रें नाचविती |नानाप्रकारें ||६६||
हरपलें सांपडून द्यावें |चोरटें तत्काळ धरावें |
थोडें अन्न पुरवावें |बहुत जनांसी ||६७||
ऐसें वर्ततें लोकीं |येणें सार्थक नव्हे कीं |
अध्यात्मविद्या विवेकीं |जाणिजेते ||६८||
पिंडज्ञान तत्वज्ञान |आत्मज्ञान ब्रह्मज्ञान |
पिंडब्रह्मांड सकळ शोधून |राहिले जे ||६९||
पदार्थज्ञानाचा बडिवार |त्याहून थोर ईश्वर |
ऐसे प्राणी लहान थोर |सकळ जाणती ||७०||