अरे अरे रावणा राम आला रे|
जनकजा आणिली तेणे तो क्षोभला रे ||  
निशाचर कुळाचा क्षयो मांडला रे |
रामें युद्ध केलिया मग जाणवेल तुजला रे ||ध्रु.||
देव आणि दानवा वाली आवरेना रे |
बंधुजाया अभिळासी दोष विचारीना रे |
तरूवर बिकट ज्याचे त्यास मारवेना रे | 
ऐसा तोहि मारिला तुज का कळेना रे ||१||
गोळांगुळासहित सिंधुतीरी आला रे |
बिभीषण जाऊन शरण निघाला रे |
जाणोनिया अंतर त्याचे रामे आपंगिला रे |
लगवेग करूनिया सिंधू पालाणिला रे ||२||
भूमंडळ व्यापिले परचक्र आले रे |
धुशर दाटले दळ खवळले रे| 
हुडा हुडा गर्जती गगनी भेदिले रे |
रामासी का विरोध रामें काय केले रे ||३||
त्रिदश देवाचा बंद धरिला रे|
सिकविले नायकेचि दैत्य मानला रे ||
रामदास दातारें सुड घेतला रे||४||