टीप: कोड्यांचे अर्थ ज्येष्ठ समर्थ अभ्यासकांनी लावलेले आहेत.ते केवळ अभ्यास दिग्दर्शनासाठी दिलेले आहेत.त्यापेक्षा निराळे अर्थ अभ्यासकांना सापडू शकतात.

सत्ताविसी जे तेरावे| त्याचे श्रीमुख बरवे|| १||
पाचा अक्षरी उच्चार| त्यासी माझा नमस्कार|| २||

रत्नसंख्या अभ्यंतरी| सर्वकाळ त्या सुंदरी|| ३||
इंद्रासनाचे आयन| रामदासे केले ध्यान|| ४||

उत्तर ---


१) एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत. त्या सत्तावीस नक्षत्रातील तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आहे. या हस्त नक्षत्राचे एक विशेष आहे की या नक्षत्रातील लोकांचे शरीर हे सुडौल लंब असते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात अशा लंबोदर सुडौल शरीर असलेल्या आणि ज्याच्या नावाचा उच्चार पाच अक्षरी आहे अशा त्या श्रीगजाननाचे मुख गजाचे असून ते बरवे आहे . त्या पाचअक्षरी श्रीगजाननास श्रीसमर्थ रामदास यांनी नमस्कार केला आहे. श्रीगजाननाचे अंतर मन अनेक रत्नांनी सुशोभित आहे. श्रीगजाननाच्या अंगी असलेल्या रत्नांची संख्या म्हणजे १४ विद्या या असून या विद्या सर्वकाळ सुंदर आहेत. इंद्रासनाचे आयन म्हणजे स्वर्गाच्याही पलीकडे असलेल्या अशा परमधामातील त्या प्रभूचे श्रीरामदासस्वामी ध्यान करतात .

( श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या अभंग गाथा संपादक चंद्रशेखर अनंत आठवले या ग्रंथाच्यानुसार )

२) सत्ताविसी म्हणजे सत्ताविस मण्यांची जपमाळ अर्थात सारणी . या माळेतील तेरावे म्हणजे प्रभू श्रीरामांचा “ श्रीराम जयराम जय जय राम ” हा त्रयोदशाक्षरी जपमंत्र. पाचा अक्षरी उच्चार म्हणजे श्री भगवान महादेव शिव यांचा “ नम: शिवाय ” हा जपमंत्र . या सारणीत ब्रह्मांडातील रत्ने म्हणजे नक्षत्रे ही सुंदर शोभून दिसतात. इंद्रासनाचे आयन म्हणजे ज्या ठिकाणी इंद्राचे आसन आहे त्याच्याही पलीकडे म्हणजे स्वर्गाच्याही पलीकडे असलेल्या परमधामात जाणे . सारणीत असणारा “ श्रीराम जयराम जय जय राम ” हा जप त्यामाळेत अत्यंत शोभून दिसतो. आणि “ नम: शिवाय ” या पाच अक्षरी जपमंत्राचे उच्चारण करीत आपण भगवान श्री शंकर यांचे ध्यान करतो ते महादेव श्रीशंकर भगवान श्रीरामनामाचा जप निरंतर करतात. अशा या सारणीचा वापर करुन समर्थ श्रीरामदास स्वामी इंद्राच्या आसनापलीकडे असलेल्या परमधामातील प्रभू श्रीरामाचे ध्यान करतात.

( समर्थ वाग्वैजयंती समर्थांची लोकगीते लेखक डॉ. नंदकुमार मराठे यांच्यानुसार येथे दिले आहेत .)