नमू येकदंता माता ब्रह्मसुता । सद्गुरु समर्था दंडवत || १ ||
दंडवत माझें संतसज्जनांसी । भाविक जनांसी आलिंगन || २ ||

आलिंगिला राम सबाह्य अंतरी । संसारसागरी तरावया || ३ ||
तरावया रामनामाची सांगडी । साधनें बापुडी शिणावया || ४||

शिणावया मूळ लोभचि केवळ । जाहला चांडाळ वाल्हा कोळी || ५ ||
वाल्हा कोळी लोभ सांडुनी बैसला । नामें उद्धारला रामाचेनि || ६ ||

रामाचेनि नामें वाल्हा तो वाल्मीक । तया ब्रह्मादिक जाणतील || ७ ||
जाणतील शतकोटी रामायण | भविष्य कवण दुजा करी || ८ ||

दुजा करी ऐसा नाहीं जन्मला । स्वयें विनविला सदाशिव || ९ ||
सदाशिव जाणे कवित्वाचा पार । नेणती इतर थोर थोर || १० ||

थोर थोर जरी जाले नामांकित । उपमा उचित देतां नये || ११ ||
देतां नये रामनामाचें चरित्र | जैसी ते पवित्र गोदावरी || १२ ||

गोदावरीकथा कीर्ति या रामाची । संसारश्रमाची विश्रामता || १३ ||
विश्रामता जाली रामउपासकां । जैसी ते जातका जळवृष्टि || १४ ||

जळवृष्टि केली वाल्मीक ऋषीनें । तयांचें वचनें सांगईन || १५ ||
सांगईन रामचरित्र निर्मळ । जैसें तें मंडळ मार्तंडाचें || १६ ||

मार्तंडाचे कुलीं राघव जन्मला । भाग्योदयो जाला विबुधांचा || १७||
विबुधांचा राव आला सोडवणें । आम्हां तेणें गुणें जोडी जाली || १८ ||

जोडी जाली थोर ऋषी संतोषले । यज्ञ सिद्धि नेले रामचंद्रे || १९ ||
रामचंद्रे बाणीं ताटिका पिटिली | शिळा उद्धरिली हेळामात्रें || २० ||

हेळामात्रें रामें त्र्यंबक भंगीलें । आणी प्रणीयेलें जानकीसी || २१ ||
जानकीसी रामें केला वनवास । पितयाची भाष मुक्त केली || २२ ||

मुक्त करावया त्रिदश देवासी । रामें वैभवासी सोडियेलें || २३ ||
सोडियेले सर्व जाहला तापसी । पंचवटिकेसी वास केला || २४ ||

वास केला रामें मारिले राक्षस । खरदूषणास संहारिले || २५ ||
संहारिले दैत्य कुरंगा पिटिले । तवं मागे नेलें जानकीसी || २६ ||

जानकीसी नेलें रावणें चोरूनि । बंधु दोघे वनीं पाहताती || २७ ||
पाहताती पुढें जटायु भेटला । रामें मुक्त केला निजहस्तें || २८ ||

निजहस्तें वनीं कबंधा मारिलें । रामें मुक्त केलें निजदासां || २९ ||
दासांचें मंडण पंपासरोवरीं । भेटला तो हरी राघवासी || ३० ||

राघवासी भावें भेटला मारुती । रामचंद्र चित्तीं संतोषले || ३१ ||
संतोषला राम बोले आशीर्वाद । काया हे अभेद राहो तुझी || ३२ ||

राहो तुझी काया सदा चिरंजीवी । तुष्टले गोसावी निजदासां || ३३ ||
निजदास रामें सुग्रीव रक्षिला । वाळी वधियेला दुष्टबुद्धि || ३४ ||

दुष्टांचा संहार धर्माची स्थापना | जानकीजीवना राघवासी || ३५ ||
राघवासी तया किष्किंधा पर्वतीं । मिळाले जुत्पती असंख्यात || ३६ ||

असंख्यात कपी सुग्रीवें आणिले । जैसे उचलले कुळाचळ || ३७ ||
कुळाचळ ऐसे मिळाले वानर । लंकेवरी भार चालियेले || ३८ ||

लंकेवरी कपीदळभार आला । सिंधु पाल्हाणिला रामचंद्रे || ३९ ||
रामचंद्रे अपंगिला बिभीषण । पुढें कपिगण घांविन्नला || ४० ||

धांविनले तेंहीं वेढीलें त्रिकूट । राक्षसांचे थाट चालियेले || ४१ ||
चालिले राक्षस भिडती वानर । दैत्यांचा संहार आरंभिला || ४२ ||

आरंभीं वधिला प्रहस्त प्रधान । रणीं जीवदान रावणासी || ४३ ||
रावणासी रामें दिल्हें जीवदान । मग कुंभकर्ण वधियेला || 88 ||

वधिला इंद्रजित आणि अतिकाय । पुरुषार्थी राय लक्षुमणें || ४५ ||
लक्षुमणें वीर इंद्रजित् दारुण । मारिला रावण रामचंद्रे || ४६||

रामचंद्रे सर्व दैत्य निर्दाळिले । पूर तुंबळले शोणिताचे || ४७ ||
शोणीताचे पुर वाहती खळाळा । रामें बंदिशाळा फोडियेल्या || ४८ ||

फोडियेल्या रामें सर्व बंदिशाळा । आपुलाल्या स्थळा देव गेले || ४९ ||
देव गेले सर्व मारिला रावण । लंके बिभीषण स्थापियेला || ५० ||

स्थापियेला रामें जानकी आणिली । अग्नीतूनि आली दिव्यरूप || ५१ ||
दिव्यरूप सीता राघवा भेटली । पुष्पवृष्टि केली सुरवरीं || ५२ ||

सुरावरां मुक्त केलें राघवानें । गगनीं विमानें झळकती || ५३ ||
झळकती विमानें दिव्य महा थोर । बैसले वान्नर तयामधें || ५४ ||

तयामध्यें मुख्य रामलक्षुमण । सीता सुलक्षण पतिव्रता || ५५ ||
पतिव्रता समें वामांकी घेतली। तेथें आज्ञा जाली सुरवरां || ५६ ||

सुरवरां आज्ञा देऊनि निघाले । आश्रमासी आले ऋषीचीया || ५७ ||
ऋषींचे आश्रमी राम स्थिरावले । सामोरें धाडिलें हनुमंत || ५८ ||

हनुमंता जाणे भरताकारणें । नाहीं तरी प्राण वेंचईल || ५९ ||
वेंचईल प्राण भरत प्रेमळ । न लावितां वेळ राम आले || ६० ।।

राम आले शीघ्र भेटों भरतासी । मात अयोध्येसी जाणवली || ६१ ||
जाणवली मात जाहला आनंद । आनंदाचा कंद राम आला || ६२ ||

राम आला तेणें सुख सर्वलोकां । गुढिया पताका उभविल्या || ६३ ||
उभविलीं छत्रें बांधिलीं तोरणें । वाद्यें सुलक्षणें वाजिन्नलीं || ६४ ||

वाजिन्नलीं वाद्ये आल्या नरनारी । आरतीया करीं घेऊनीयां || ६५ ||
घेऊनीयां करीं रत्नदीपताटें । वोवाळीती थाटें वनितांचीं || ६६ ||

वनितांचीं थाटें पाहाती श्रीराम । भरतासी क्षेम दिल्हें आहे || ६७ ||
दिल्हें आहे क्षेम जाहले अभिन्न । अनुक्रमें जन सुखी केले || ६८ ||

सुखी केल्या माता कौसल्या सुमित्रा । कैकयी सुंदरा सुखी केली ||६९||
सुखी केले रामें संत ऋषी मुनि । मंत्रघोंषध्वनी आशीर्वाद || ७० ||

आशीर्वादी राम पूजिला ब्राह्मणीं । मग सिंहासनीं आरूढला || ७१ ||
आरूढला राम दिव्य सिंहासनीं । छत्रीं सुखासनीं दाटी जाली || ७२ ||

दाटी जाली थोर मिळाले वानर । तेणें राजद्वार कोंदाटलें || ७३ ||
कोंदाटली बहु छत्रें सूर्यपानें । पताका निशाणें मेघडंब्रे || ७४ ||

मेघडंबावरी मत्स्य तळपती । वाद्ये वाजताती नानावणें || ७५ ||
नानावर्णै घन सुस्वर सुंदर । वाजती गंभीर शंखभेरी || ७६ ||

शंखभेरीनाद न माय अंबरीं । सिंहासनावरी देवराणा || ७७ ||
रामराणा धीर उदार सुंदर । पाहुणे वानर तयां घरीं || ७८ ||

तयाघरीं नळ नीळ जांबुवंत । सुषेण मारुत बिभीषण || ७९ ||
बिभीषण आणी वाळीचा कुमर । कपी थोर थोर नामाथीले || ८० ||

नामाथीले कपी सहपरिवारें । गौरवी आदरें देवराणा || ८१ ||
देवरायें वस्त्रे भूषणें आणिलीं । भांडारें फोडिलीं अमोलिकें || ८२ ||

अमोलिकें रामें फोडिलीं भांडारें । आवडी वानरें श्रृंगारिलीं || ८३ ||
शृंगारिले सर्व आनंद भरित । राम बोळवीत वानरांसी || ८४ ||

वानरांसी रामवियोग साहेना । उभड धरेना कंठ दाटे || ८५ ||
कंठ दाटे तेणें आक्रंदती थोर । नयनीं पाझर पाझरती || ८६ ||

पाझरती सर्व दनिरूप जाले । पोटेंसीं धरिले मायबापें || ८७ ||
मायबापें रामें सर्व सुखी केले । मग बोळवीले निजदास || ८८ ||

निजदास कपी सन्नीध राहीला । तोहि गौरविला स्तुतिवाक्यें || ८९ ||
स्तुतिवाक्य काय सांगों श्रीरामाचें । होय विश्रामाचें निजसुख || ९० ||

निजसुख जनीं नाहीं वृद्धपण । कोणासी मरण तेंहि नाहीं || ९१ ||
नाहीं नाहीं जनीं बंधनाचें पाप । सुखीं सुसरूप रामराज्य || ९२ ||

रामराज्यीं नाहीं जनासी ताडण । धर्मसंरक्षण राम येक || ९३ ||
राम येकबाण येकची वचन । साधूचें पाळण राम येक || ९४ ||

राम येक राजा पुण्यपरायण । गोपिका ब्राह्मण भक्ती करी || ९५ ||
भक्ती करी राम गाई ब्राह्मणांची । सीमा मर्यादेची उल्लंघीना || ९६ ||

उल्लंघीना सीमा रामगुण गातां । राघव तत्वता निष्कपटी || ९७ ||
निष्कपटी राम निर्दोष अंतरीं । आक्रा सहस्रवरी राज्य केलें || ९८ ||

राज्य केलं राम सुख सर्वजना | वैकुंठभुवना पुरी नेली || ९९ ||
पुरी नेली रामें सकळांसहित । करावया मुक्त निजदासा || १०० ||

निजदास रामें मारुती ठेविला । चिरंजीव केला कल्पकोडी || १०१ ||
कल्पकोडी ऐसा देउनियां वर । निघाले सत्वर वैकुंठासी || १०२ ||

कल्प कोटी रामें केला निजरूप । माझेंचि स्वरूप तूंचि येक || १०३ ||
वैकुंठासी राम गेले विश्रांतिये । जनासी उपाय हनुमंत || १०४ ||

हनुमंतीं राम आहे निश्चयेंसीं । रामी रामदासी ऐक्यभाव || १०५ ||

शब्दार्थ ----

१) सांगडी- नदी उतरून जाण्यासाठी भोपळे बांधून करीतात ती सांगड.
सांगडीवर बसून जाण्यांत शीण नीह, बुडायची भीति नाही. (ओवी क्र. ४)
२) त्र्यंबक- शिवचाप, (ओवी क्र. २१)
३) प्रणीयेलें णियेले- विवाह केला. (ओवी क्र. २१)
४) पितयाची भाष- दशरथाला वचनांतून सोडविलें, सत्यप्रतिज्ञ केलें. (ओवी क्र. २२)
५) कुरंगा- सुवर्णमृग (ओवी क्र. २६)
६) जुत्पती - जेठी, मल्ल (ओवी क्र. ३६)
७) कुळाचळ- कुलपर्वत (ओवी क्र. ३७, ३८)
८) पाल्हाणिला- आच्छादिली, सेतू रचुन समुद्र झांकला (ओवी क्र. ३९)
१०) अपंगिला- रक्षिला (ओवी क्र. ४०)
११) नामाथीले- नामांकित, निर्दिष्ट केलेले. (ओवी क्र. ८१)
१२) उभड- उमाळा, गहिंवर आवरेना. (ओवी क्र. ८५)
१३) गोपिका ब्राह्मण- स्त्रियांची व ब्राह्मणांची(ओवी क्र. ९५)