आरंभी वंदीन विघ्नविनायका|
मुख्य येक देव कळावया||१|
कळावया काहि आपुले स्वहित|
सक्रिया विहित वेदाधारें||२||
वेदाधारे क्रिया ज्ञान प्रचीतीचे|
तरीच मनाचे समाधान||३||
समाधान होते श्रवणमननें|
सगुणभजने अनुतापे ||४||
अनुतापे त्याग तोचि येक योग|
देवाचा संयोग दास म्हणे ||५||