सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ||
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
जयदेव जयदेव || १ ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुंम केशरा |
हिरे जडित मुगुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपूरे चरणी घागरीया ||
जयदेव जयदेव || २ ||
लंबोदर पितांबर फणिवरबंधना|
सरळशुंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ||
जयदेव जयदेव ||३||

शब्दार्थ ----

१. नूरवी - न उरवी, शिल्लक रहात नाही
२. पूरवी - देतो, पुरवतो
३. मुक्ताफळ - एक दागिना, मनात कल्पिलेली गोष्ट/ईच्छा पूर्ण करणारी माळ
४. फरा - मुकुटामध्ये खोवलेला रत्नजडित तुरा
५. घागरिया - पायातील तोडे

भावार्थ ---


श्री गणपतीच्या अनेक आरत्या आहेत .त्यापैकी सुख कर्ता दुःखहर्ता ही प्रसिद्ध व घरोघरी माहित असणारी आरती आहे. ही आरती समर्थ रामदासांनी लिहिली आहे .गणेशाचे ध्यान ,प्रार्थना व त्याचे रुपवर्णन यात आहे.समर्थांना ही आरती अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वराची मूर्ती पाहून लिहिण्याची प्रेरणा मिळाली .ही आरती जोगिया रागात रचली आहे. पहिल्या कडव्यात समर्थ म्हणतात, ज्याच्या दर्शनाने भक्तांच्या इच्छा,कामना पूर्ण होतात त्या मंगलमय , पवित्र गणरायाचा जयजयकार असो.तू सुख देणारा व दुःख हरण करणारा आहेस.म्हणून तुला सुखकर्ता व दुःखहर्ता म्हणतात . भक्तांच्या अवती भवती असणाऱ्या दुःखाच्या वार्ता तू शिल्लक ठेवत नाहीस उलट प्रेमाची कृपाच करतोस . तुझ्या सर्वांगावर शेंदूर लावलेला आहे आणि गळ्यात मोत्यांची माळ झळकत आहे. शेंदूर लावण्यामागे वैज्ञानिक आधार असा की मूर्तीस कोणताही अपाय होऊ नये व कथाभाग असा की , आपल्या आराध्य दैवतास दीर्घायुष्य लाभावे म्हणून जसे सीतामाई ने भांगात शेंदूर भरला ते पाहून हनुमंताने आपल्या सर्व अंगावर शेंदूर लावून घेतला .अशीही कथा सांगतात की शेंदूर नावाच्या राक्षसाचा गणेशाने वध केला व त्याच्या रक्ताने शरीर माखले . दुसऱ्या कडव्यात गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्रसंगीत वर्णन केले आहे गजानन पार्वतीचा पुत्र म्हणून गौरीकुमारा असे विशेषण आहे. हिरेजडित म्हणजे हिऱ्यांचा बनविलेला , घडविलेला मुकुट त्याच्या मस्तकी आहे आणि त्या मुकुटात खोवलेला तुरा (फरा) तर खूपच शोभून दिसत आहे . पायात घातलेल्या वाळ्यातील ( लहान मुलांच्या पायात घालण्याचा दागिना ) घुंगरांचा रुणझुण असा मंजुळ ध्वनी ऐकू येत आहे . कपाळावर कुंकू व केशरमिश्रीत चंदनाची उटी तू लावली आहेस .अशा गौरिकुमारा तुझा जयजयकार असो . पुढे गणपतीच्या शरीरयष्टीचे वर्णन केले आहे.त्याचे पोट मोठे असून त्याने पिवळ्या रंगाचे वस्त्र ( पितांबर) परिधान केले आहे .कमरेला नागाचे कडदोर अर्थात बंधन आहेत.त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे. त्यास तीन नेत्र आहेत ,ते त्याचे सूक्ष्म रूप असून तिसरा नेत्र दिव्य "ज्ञान चक्षू "आहे. अशा रुपात गणपतीने देहरूपी घरी यावे, पुन्हा जन्म हेच संकट आहे. त्यामुळे मृत्यूसमयी तुझेच स्मरण राहू दे म्हणजे योग्य गती प्राप्त होऊन पुन्हा जन्म येणार नाही, मोक्ष लाभेल. हेच सांभाळणे. अशी समर्थ प्रार्थना. निजात्मबोधात, स्वस्वरूपी येण्याची वाट पहात आहे ही आर्तता येथे दिसते.कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ गणेश स्तवनाने करतो तसेच कुठेही आणि केव्हाही आरतीचा प्रारंभ सुखकर्ता दुःखहर्ता या समार्थांच्या आरतीनेच केला जातो. साध्या सोप्या शब्दांत अत्यंत श्रद्धा युक्त अंत:करणाने केलेली ही गणेश स्तुती आहे. सर्वांना सहजपणे समजेल आणि म्हणता येईल इतकी ती गेय आहे.म्हणूनच कोट्यावधी लोक ती म्हणू शकतात . श्रीसमर्थांनी या आरतीत श्रीगणेशाच्या सगुणरुपाचे वर्णन केले असून निर्गुण परमात्मस्वरुपाचे ही वर्णन केले आहे. प्रथम गणेश सुखकर्ता दु:खहर्ता का आहे हे श्रीसमर्थ सांगतात. श्रीगणेश म्हणजे विवेकबुद्धी. मनुष्याला सुख दु:ख ही देह,गुण,काल,अवस्थांमुळेच प्राप्त होतात. मनुष्य देहसुखासाठी विषयांच्या मागे धावतो, स्पर्धा, द्वेष,मोह मत्सर, राग, लोभ,मद या तमोगुणामुळे स्वतःचा नाश ओढवून घेतो, रजोगुणाने तो मी व माझे या स्वार्थीपणात रमतो तर जादा सत्वगुणानेही स्वतःचे नुकसान करुन घेतो कारण अतिरिक्त सत्वगुण हाही दुर्गुणच आहे‌. तसेच अविवेकाने अनेक विघ्नेसुद्धा प्राप्त करतो. सारासार विवेकबुद्धीने सर्वांचा विचार केला तर आपण परमात्मस्वरुपच आहोत हि खात्री त्याला पटून त्याची देहबुद्धी नाहीशी होते, त्रिगुणांपलिकडे जाण्याचे प्रयत्न होतात, षडरिपूंवर मात करुन त्यांच्याही पलिकडे तो जातो. अज्ञान नाहिसे होते आणि मनुष्य शांत होतो. त्याला शाश्वत सुख,आनंद मिळतो. अथर्वशीर्षात श्रीगणेश हा देह, काल, गुण, अवस्था तीत आहे असे अवस्था यांच्या अतीत म्हणजे पलिकडे आहे असे म्हटले असल्याने श्रीगणेश आनंदरुप असे परमात्मस्वरुपच आहे. परमात्मस्वरुप हे सत्य चित् आनंदस्वरुप असते हे श्रीसमर्थ आत्मसाक्षात्कारी असल्याने जाणतात. आता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची याचा अर्थ काय असावा हे पाहुया. श्रीगणेश ब्रह्मरुप आहे ,आनंदरुप आहे म्हणून तो सुखकर्ता आणि आनंदाचा सागरच असल्याने दु:ख हा विरोधी शब्द त्याला स्पर्शच करत नाही. अशा आनंदमय गजाननावर श्रद्धा असलेल्या भक्तांच्या भवसागरातील सर्व संकटांचा नाश होतो. काळजी करणारा, द्वेष, मत्सर करणारा, जुन्या आठवणींना साठवून वेळोवेळी उजाळा देणारा कधीच सुखी, शांत असत नाही. त्यामुळे मनुष्याने सर्व दुर्गणांना विवेकाने दूर ठेवावे म्हणजे त्रिगुणातीत होऊन श्री गणेशा सारखेच होण्याचा प्रयत्न करावा म्हणजे मनुष्यालाही शांतता लाभून शाश्वत सुख लाभेल. त्वं सच्चिदानंद अद्वितियोसी. श्रीगणेश सर्वव्यापी व अद्वितियोसी म्हणजे शाश्वत असे एकमेव चैतन्य आहे. हे एकमेव तत्व अंशरुपाने सर्वत्र भरले आहे हे मनुष्याने जाणले असता द्वेष, भांडण,मत्सर, हेवेदावे नाहिसे होऊन मनुष्याची दृष्टी प्रेममय होते, म्हणजेच विघ्नाची वार्ता सुद्धा नुरते आणि प्रेम पुरविते असा अर्थ येथे असावा असे मला वाटते. मनुष्याने जर विवेकबुद्धीने षडरिपू, मी व माझे, या बंधनातून मुक्त होण्याचे ठरविले तर तो नक्कीच मुक्त होईल कारण कोणतीच कामना उरणार नाही असे श्रीगणेशाने कंठात मुक्ताफळांची माळ धारण केली याचा अर्थ असावा. तसेच कामना पूर्ती या शब्दाने ही हेच सांगितले असावे असे मला वाटते. वक्रतुंड हा अर्थ विवेकाने वाकड्या विचारांना मारणारा, सरळ करणारा असा होतो. फणिवरवंदना या शब्दाने काय सूचित होते ? फणिवर याचा अर्थ नाग. सत्ता, संपत्ती,किर्ती,यश, प्रतिष्ठा इ. अनेक ऐषणारुपी नाग श्रीगणेशाला वंदन करतात म्हणजे श्रीगणेश त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मनुष्याने सुद्धा विवेकबुद्धीचा सहाय्याने या नागांवर वर्चस्व मिळविले पाहिजे. त्रिनयना म्हणजे ज्ञानरुपी असा तिसरा डोळा.विवेकाने अज्ञान नाहिसे होते व ज्ञान प्राप्त होते. रत्नजडित मुकुट हा शब्द आरतीत आहेच मग परत चंदनाची उटी कुंकुम केशरा चा उल्लेख करुन श्रीसमर्थ सांगत असावेत कि मनुष्याचे आयुष्य हे चंदनासारखे असावे म्हणजे स्वतः झिजून सुगंधरुपाने उरावे. कुंकुम केशर याचा अर्थ वैराग्यपूर्ण जीवन . निर्वाणी रक्षावे म्हणजे काय? मृत्यूचे भय सर्वांनाच असते पण श्रीगणेश कालातीत असल्याने तो निर्वाणी रक्षा करतो म्हणजे गणेश भक्त हा निर्भय असतो. दास रामाचा वाट पाहे सदना याचा अर्थ पाहुयात. सदन म्हणजे घर , मानवी शरीर हे सुद्धा घरच आहे. सर्व दैवीगुण या आरतीत सांगून ते सर्व मनुष्याने अंगी बांधले तर तो परमात्मस्वरुपच होतो. श्रीसमर्थ संपूर्ण विश्व हेच घर समजत होते, त्यामुळे भारतभ्रमणात घराची अतिशय दयनीय स्थिती झालेली अतिशय व्याकूळ सर्व अमंगल टाळण्यासाठी मंगलमूर्तीला आर्त प्रार्थना या आरतीतून करीत आहे.