श्रीसमर्थांनी अफाट वाङ्ममय निर्मिती केली. त्यातील एक दालन म्हणजे " आरत्या ". श्रीसमर्थांनी ८० पेक्षा अधिक आरत्या रचल्या.
आरती म्हणजे आर्तता, व्याकुळता, तळमळ व्यक्त होणे. मोठ्या आर्ततेने देवदेवतांची आळवणी म्हणचे आरती.
भक्तीची परिसीमा म्हणजे आरती. भावबिभोर अवस्थेत देवाला हाक मारणे म्हणजे आरती.
श्रीसमर्थांच्या आरत्यांमध्ये व्यापकता आहे. विविध देवदेवतांबरोबरच कृष्णा नदीची आरती, भक्तांची आरती, सर्व संतांची आरती करणारे विरळा असे श्रीसमर्थ !
श्रीसमर्थांच्या आरत्या भावाने ओतप्रोत भरलेल्या आहेत, त्यात गेयता आहे, शब्दांची चपखल योजना आहे, ठेका आहे,
भाषा ओघवती आहे, प्रासादिक आहे. आरती म्हणताना त्या देवाचे सगुणरूप डोळ्यासमोर उभे नाही राहिले तरच नवल !
असे हे श्रीसमर्थ रचित आरत्यांचे हे ऑनलाईन दालन ! या आरत्या आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी उपलब्ध करून देताना आनंद होत आहे.
ज्याप्रमाणे ग्रंथसंग्रहालयात कोणतेही पुस्तक घ्यावे आणि वाचावे त्यानुसार हा आरती संग्रह -- श्रीसमर्थ रचित कोणतीही उघडावी आणि
अर्थ पहावा आणि आनंद घ्यावा, रसास्वाद घ्यावा हाच उद्देश.
( संदर्भ - श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत आरत्या,
संपादक व विवेचन -
डॉ. श्री विजय व. लाड,
संचालक,
दासबोधाचा सखोल अभ्यास उपक्रम )