विषय प्रवेश

हे लघुकाव्य अभ्यासताना दासबोधातील ओवी आठवल्याशिवाय रहात नाही --
संसार मुळीच नासका ।
विवेके करावा नेटका ।
नेटका करिता फिका ।
होत जातो ।। १९.१०.२८
या लघुकाव्यात एका मुमुक्षुचे वर्णन केले आहे. संसारातील फोलपणा लक्षात आला आहे आणि इतके दिवस आधार वाटणारा प्रपंच आता नकोस वाटू लागला आहे,
कारण त्याचा फोलपणा आणि अशाश्वतात जाणवू लागली आहे, इतके वर्ष त्यात गुंतून आयुष्य वाया घालवले याची जाणीव या मुमुक्षुस होत आहे.
भजनरहीत रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा वेर्थ म्यां स्वार्थ केला ।
रघुपती मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी ।।
अशी अवस्था आहे या मुमुक्षुची .
प्रापंचिक सत्य जाणवल्याशिवाय आणि चटके खाल्ल्याशिवाय मनुष्य परामार्थाकडे वळत नाही. अशाश्वतकडून शाश्वतकडे जायचे असेल
तर सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही असे हे काव्य सांगते. आंतरिक तळमळ लागल्याशिवाय सद्गुरू भेट नाही. आत्मज्ञान हवे असेल,
जन्म-मरणातून कायमस्वरूपी सुटका हवी असेल तर सद्गुरू हवेतच ! हे सद्गुरू म्हणजे माऊली !
तिच्याकडे मन मोकळे करावे, व्यथा सांगावी. ही व्यथा पहिल्या समासात दिसते.
दुसऱ्या समासात सद्गुरू आपल्या सतशिष्याला उपदेश करतात. सुरवातीला देहबुद्धीचा परिणाम कथन करतात.
हे देहबुद्धी कमी करायची असेल, घालवायची असेल तर साधनाचे महत्व सांगतात.
साधनेतील सातत्य, त्याचे महत्व हे तिसऱ्या समासात सद्गुरू समजावून सांगतात. साधनेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही
असे ठाम प्रतिपादन श्रीसमर्थ या समासात करतात. हे सर्व ऐकून या मुमुक्षुची उत्सुकता वाढीस लागते आणि
तो सिद्धपणाविषयी विचारतो. याचे उत्तर चौथ्या समासात दिले आहे.

सिद्धपण प्राप्त झाले म्हणजे सर्व काही झाले हा भ्रम या समासात दूर करताना पुन्हा एकदा साधना करायलाच हवी असे चौथ्या समासात निक्षून सांगतात.
पाचव्या समासात जन्ममृत्यू, माया, देहबुद्धी यावर भाष्य आहे. ते वाचताना मनातील अनेक शंका दूर होतात.
सगुणाचेनी आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे ।। सहाव्या आणि अखेरच्या समासात सगुण पूजेचे महत्व प्रतिपादन केले आहे.
तसेच हरिकथा श्रवण महत्वाचे आहे असे सांगितले आहे. देवपूजा, हरिकथा श्रवण, नित्यनेम यांबरोबरच नामस्मरणा चे महत्व सांगितले आहे.
नामस्मरणाच्या आधारे भवसागर तरून मनुष्यजन्माचे सार्थक करुन घ्यावे असे अखेरीस सांगितले आहे.
असे हा रसाळ गुरुशिष्यांचा संवाद प्रत्येकाने मनापासून वाचवा, त्यावर चिंतन करावे आणि हा उपदेश उराशी बाळगून स्वतःचा उद्धार करून घ्यावा.

समास १

हा समास वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते, त्यामुळे एक वेगळीच जाणीव होते.
जणू काही मीच माझ्या सद्गुरुंच्या कुटीमध्ये गेलो आहे आणि माझे मन मोकळे करत आहे असे जाणवते. संसारात मी खूपच त्रासलो आहे,
या संसारातील फोलपणा मला जाणवत आहे. त्यामुळे मी सद्गुरूंना मनोभावे शरण गेलो आहे आणि
आता मला यातून सोडवा हीच एकमेव भावना सद्गुरूंना भेटण्यामागची आहे असे जाणवते.
हे लघुकाव्य म्हणजे सद्गुरू-शिष्य यांचा संवाद आहे. हा शिष्य मन मोकळे करत आहे आणि
त्यांची गुरुमाऊली शांतपणे ऐकत आहे. हा शिष्य मुमुक्षु पातळीवरील आहे.
तेणे नव्हे समाधान ।
वाटे अवघाच अनुमान ।
म्हणे रिघो संतांस शरण ।
या नाव मुमुक्ष ।।
( दासबोध ५-८-३९ )
अहंता सांडूनि दूरी ।
आपणास निंदी नानापरी ।
मोक्षाची अपेक्षा करी ।
या नाव मुमुक्ष ।।
( दासबोध ५-८-४१ )

सद्गुरूंची भेट होताच शिष्य त्यांच्या चरणी लीन होतो आणि उदास मनःस्थितीत आपले मन मोकळे करतो.
तो सांगतो -- संसार करताना मी त्यात एवढा गुंतलो की काही काळ तुमचे विस्मरण झाले.
परिणामी माझा अहंभाव वाढीस लागला. त्यामुळे देहबुद्धी प्रबळ झाली, माझी वासना, कामना वाढली.
त्यामुळे हवेपण वाढीस लागले. दृश्य जगात मी रमलो. अशाश्वताच्या मागे धावू लागलो. ईश्वराचा विसर पडला आणि संसार सत्य वाटू लागला.
अपूर्णत्व हा संसाराचा गुणस्वभाव आहे. त्या अपूर्णालाच पूर्ण मानून मी ( अशाश्वत )सुखासाठी झुरलो,
त्यामुळे मी समाधान गमावून बसलो आहे. समाधान नसल्यामुळे अविवेकी वर्तन होऊ लागले आहे. दृश्याच्या मागे लागून वृत्ती ढळू लागली आहे.
ओवी सहा वाचताना शिष्य, " स्वामी " अशी कळवळून हाक मारतो आणि सांगू लागतो -- आसक्ती,
अपूर्णता, अशाश्वतता या प्रपंचाचा गुणांमुळे माझा परमार्थ बुडाला, तुमच्या आज्ञेचे पालन करू शकत नाही.
माझी साधना थांबली आहे. मनाच्या दुश्चितपणामुळे चित्तवृत्ती ढळू लागल्या आहेत, मनाचे समाधान हरवले आहे. प्रपंचात आता मन रमत नाही.
दासबोधात प्रपंचाचे वर्णन श्रीसमर्थ करतात ---
संसार म्हणिजे माहापूर ।
माजी जळचरे अपार ।
डंखू धावती विखार ।
काळसर्प ।। ( दासबोध ३.१०.१ )
शिष्य विनवणी करतो की माझ्या मनातील तुम्ही सर्वकाही जाणता. आता तुम्हीच मला य भवसागरातून वाचवा,
बाहेर काढा. माझ्यावर तुमची कृपादृष्टी होऊ दे आणि शाश्वत समाधान प्राप्त होऊ दे. आपणच माझे तारणहार आहात.
शिष्याचा हा भाव पाहून, अवस्था पाहून सद्गुरू प्रेमळपणे शिष्याला समजावतात.
काय सांगतात, कसे समजावतात हे पुढील समासात पाहू.

देखोन शिष्याची अनन्यता ।
भावे वोळला सद्गुरू दाता ।
स्वानंद तुंबळेल आता ।
पुढिले समासी ।।