नमूं फर्शपाणी नमूं यंत्रपाणी | नमूं मोक्षपाणी नमूं चापपाणी |
नमूं चक्रपाणी नमूं शूळपाणी | नमूं दंडपाणी हरिमूलपाणी ||१||

नमूं आदिमाता नमूं योगमाता | नमूं वेदमाता नमूं विश्वमाता |
नमूं भक्तिमाता नमूं मुक्तिमाता | नमूं सज्जनाची कृपा ज्ञानमाता ||२||

नमूं योगरूपी नमूं ज्ञानरूपी | नमूं संतरूपी नमूं ध्यानरूपी |
नमूं दिव्यरूपी नमूं विश्वरूपी | नमूं येकरूपी गुरु सस्वरूपी ||३||

नमूं संतयोगी नमूं सिध्दयोगी | नमू भक्त ज्ञानी विवेकी विरागी |
नमूं आत्मनिष्ठा नमूं योगनिष्ठां | नमूं सर्वश्रेष्ठां वरिष्ठां वरिष्ठां ||४||

मनी चिंतितां राम विश्राम वाटे | जगज्जाळ जंजाळ हे सर्व तूटे |
तुटे काळजी काळ जिंकावयाची | फुटे वृत्ति अर्थांतरी जावयाची ||५||

शब्दार्थ ----

फर्श - परशू (एक शस्त्र); पाणी - हात; चाप - धनुष्य; चक्र -सुदर्शन चक्र; शूळ - त्रिशूळ;
दंड - एक सरळसोट सागवानी किंवा पवित्र वृक्षाची काठी;
हरिद्रृम - पारिजातक वृक्ष; यंत्र - एक अस्र जे अभिमंत्रित असून ते मंत्रांच्या शक्तीवर चालते

भावार्थ ---


(१) ज्याच्या एका हातात परशू आहे आणि दुसऱ्या हाती यंत्र आहे अशा श्रीगणेशाला नमन करतो. ज्या श्रीरामांच्या एका हाती मोक्ष तर भक्तांच्या रक्षणार्थ दुसऱ्या हाती धनुष्यबाण आहे,त्यांना नमस्कार करतो. स्थिती सांभाळणाऱ्या श्रीविष्णूंच्या हाती सुदर्शनचक्र आहे आणि संहारकर्ता शिवांच्या हाती त्रिशूळ आहे, अशा देवांना नमस्कार करतो. (२) न्याय देण्यासाठी जो हाती दंड ठेवतो आणि कोमल अंत:करणांच्या भक्तांसाठी स्वर्गीय वृक्ष पारिजातक पृथ्वीवर आणतो त्या भगवंतास मी नमन करतो. सर्वांची आदीमाता पार्वती आणि योगमातेला नमन करून, वेदांना धारण करणा-या वेदमाता सरस्वतीला आणि विश्वमाता प्रकृतीला मी नमन करतो. (३) सर्वांठायी भक्ती निर्माण करणाऱ्या श्रध्देला, मुक्ती प्रदान करणाऱ्या मुक्तीमातेला तसेच सज्जनांवर कृपा करून ज्ञानदान करणाऱ्या ज्ञानमातेस नमन करतो. योगयुक्त, ज्ञानयुक्त, ध्यानधारणा करणाऱ्या सर्व संतजनांना नमन करतो. साधनेमुळे जे दिव्य आणि तेजस्वी होऊन विश्वव्यापक झालेले आहेत, सर्वांमधे एकपणाने असून निजानंदात निमग्न आहेत अशा श्रीसद्गुरूंना मी वंदन करतो. (४) या भूतलावर पूर्वी झालेल्या,आज असणाऱ्या आणि पुढे होणाऱ्या संत, सिध्द,योगी जे भक्ती आणि ज्ञानयुक्त आहेत,वैराग्यशाली आहेत त्यांना वंदन करतो. ईश्वराप्रती असलेल्या श्रद्धेमुळे सर्वांहून श्रेष्ठ आहेत अशा योगेश्वरांच्या चरणी वंदन करतो. (५) याप्रमाणे सर्वांना वंदन करून मनाला शांतता मिळण्यासाठी श्रीरामचंद्रांचे चिंतन करावे, त्यामुळे जगातील सर्व गुंत्यातून सुटका होते. पुढे कसे होणार ही चिंताच उरत नाही. आणि महाकाळ मृत्यूवर विजय प्राप्त करता येईल. या श्रीरामप्रभूंच्या चिंतनाने जीव अंतर्मुख होईल, त्याला श्रीरामरायांकडून योग्य ती प्रेरणा मिळेल.