डोळे चिरीव चांगले | वृद्धपणी सरक्या जाले || १ ||

बोले मातीचा भर्वसा | काय घरिती माणसा || धृ ||
मुख रसाळ चांगले | पुढे अवघे सुरकुतले ||२||

रम्य नासिक सरलें| सर्वकाळे पाणी गळे ||३||
कर्ण भूषणी सुंदर पुढे जाहले बधिर ||४||

बरवी दंताची पंगती| परि ते उन्मळोनी जाती || ५ ||
बरवे कर आणि चरण परि ते जाले निःकारण ||६||

अंगकांती होती बरी | जाली चिरकुटाचे परी ||७||
केस होताती पांढरे | लाळ गळतां न घरे ||८||

बहुसाल होते बळ | पुढे जाहले निर्बळ ||९||
देह होतो जे निर्मळ | तेचि जाहले ओंगळ ||१०||

गर्व तारुण्याचा गेला | प्राणी दीनरुप जाला ||११||
रामी रामदास म्हणे आता सावधान होणे ||१२||
थोटे पांगुळ बधिर | अधांतरी होता नर || १ ||
नाही देहाचा भर्वसा | शरण जाई जगदीशा || धृ ||

कोडी कुश्चिळ सर्वांगी | येक जाले क्षयरोगी || २ ||
येक प्राणी अंध होती | येका समंध लागती ||३||

नाना रोगाचे उमाळे | काय होईल ते न कळे | || ४ ||
रामदास म्हणे भावे वेगी सार्थक करावे ||५||
वेगी होई सावधान | ऐसे आहे वृद्धपण || १ ||
डोळे जाती कान जाती| दंत आवघेचि पडती ||धृ||

हात गेले पाय गेले देहा पाझर लागले || २ ||
दास ह्मणे शक्ती गेली | मती आवघीच बुडाली ||३||
ऐसे आहे सर्वकाही | चिरंजीव काही नाही ||१||
युक्ति जाते बुद्धी जाते | क्रिया ते हि पालटते ||धृ||

धीर विचार बुडाला | विवेक होता तोहि मेला || २ ||
रामी रामदास म्हणे वृद्धपणाची लक्षणें ||३||
अंतीं येकलें चि जावें | म्हणोनि राघवीं भजावें || १ ||
माता पिता बंधुजन कन्यापुत्र ही सांडुन ||धृ||

जन्मवरी केला भार | सेखी सांडून जोजार || २ ||
म्हणे रामी रामदास | सर्व सांडुनिया आस ||३||
काळ जातो क्षणक्षणा मूळ येईल मरण ||१||
काही धावा धावी करीं | जंव तो काळ आहे दुरि ||धृ||

देह आहे जाईजणें | भुललासी कोण्यागुणें || २ ||
मायाजाळी गुंतले मन परि हे दुःखासी कारण || ३ ||

सत्य वाटतें सकळ | परि हे जातां नाहीं वेळ || ४ ||
रामी रामदास म्हणे | आता सावधान होणें ||५||
जाले हो देह गळित | आले संसारा लाळीत || १ ||
सावधान सावधान | पुढे नाही वेवधान ||धृ||

आता मन आटोपावे| आपुल्या निजधामा जावे || २ ||
राहे देवाच्या स्मरणे | रामी रामदास म्हणे ||३||
पुण्य पाहावया कारणें | देव धाडी बोलावणे || १ ||
वाट लागेल धरावी | पुण्य सामग्री करावी || धृ ||

वाट वेच नाही जया | पुढे सुख कैचें तथा ||२||
रामी रामदास म्हणे | बुद्धिवंत ते शहाणे ||३||
अंतकाळ येतां येतां | तेथे नये चुकवितां ||१||
अकस्मात लागे जावें| काही पुण्य आचरावें || धृ ||

पुण्यविणे जातो प्राणी घडे यमाची जांचणी || २||
रामदास म्हणे जना| कठीण यमाची यातना ||३||


१०

नाही पुण्याची गांठोडी तरी तो यम डोई फोडी || १ ||
तेव्हा प्रस्ताव ही घडे प्राणी पाहे चहूकडे ||धृ||

तप्तभूमिके लोळवती| आंगी सांडस लाविती ||२||
दास म्हणे हे सकळ केल्या संचिताचे फळ ||३||

शब्दार्थ ----

१) चिरकुट= जीर्ण वस्त्र.
२) चिरीव. = रेखीव.

भावार्थ ---


तारुण्यात ज्या देहाच्या सौंदर्याचा माणसाला गर्व अभिमान असतो व त्या देहबुद्धीत रमून माणूस परब्रह्म परमात्मा यापासून दूर जातो पण पुढे वृद्धपणी या देहाची कशी दयनीय अवस्था होते हे समर्थ रामदास स्वामी ह्या अभंग प्रास्ताविक पंचकातून सांगत आहेत. समर्थांनी वृद्धपणीचा काळ दाखवून दिला आहे . ही वृद्धावस्था वेगवेगळ्या प्रकारे सांगून श्रीसमर्थ आपल्याला सावध करत आहेत आपल्या जन्माचे सार्थक व्हायला हवे असेल तर वेळ न दवडता भगवंताला शरण जाऊन साधना करून पुण्य संचय करावा सततच्या साधनेने स्वरूपाकार व्हावे आत्मज्ञानी व्हावे व मग निजधामाला जावे हे पंचक अगदी तरुणपणीच वाचावे म्हणजे लवकर सावध होऊन अखंड सावध राहता येईल. समर्थ वार्धक्यात अवस्था काय काय होते, तरुणपणातील देहाचे सौन्दर्य कसे कमी कमी होते त्याचे वर्णन येथे करत आहेत. समर्थ म्हणतात जिथे मातीचा म्हणजे पृथ्वीचा भरवसा नाही तेथे देहाचा का विश्वास धरावा.भुकंप होतो आणि क्षणांत पृथ्वीच्या पोटांत सर्व गडप होते.तारुण्यात असलेले सर्व सुंदर अवयव रेखीव डोळे, चाफेकळी नाक, धष्टपुष्ट हातपाय, मोत्यासारखे दांत, ज्याने सहज श्रवण होतं ते कर्ण हे सर्व हळू हळू निकामी होत जाते, डोळ्यांनी दिसत नाही कानानी ऐकू येत नाही, काळेभोर दाट केस एकतर पांढरे होतात किंवा सगळे गळून जातात. दंताजीचे ठाणे उठते व बलवान असलेले सुंदर शरीर अगदी निस्तेज, दुर्बळ होते. अंगावरील सर्व कातडी सुरकुतते व निर्मळ व सतेज असलेला देह वृद्धपणी अगदी दीनवाणा होतो.त्याच्या हाता पायात शक्ति राहात नाही. मुखातून, नाकातून, सारखा रस,लाळ,पाणी गळत असतं आणि तरी माणूस विषयासक्तच राहतो.म्हणून समर्थ सांगतात की बाबा आता तरी सावध हो रे