नमूं ते शारदा देवी |त्रैलोकीं जाणती कळा |जगाची जाणती ज्योती |जगज्ज्योती म्हणोनियां ||१||
जिचेनि वर्तती सर्वै |देव गंधर्व मानवी |योगी ऋषी मुनी ध्यानी |वर्तवीते अंतर्कळा ||२||

चाळणा धारणा स्फूर्ती |मती युक्ती विचारणा |सद्बुद्धी सद्विद्या ते |भुक्ती मुक्ती सायोज्यता ||३||
खेचरां भुचरां सर्वै |मोन्यगर्भविचारणा |चारी खाणी चारी वाणी |बोलवी चालवी सदा ||४||

विवरीते विचारीते |प्रवृत्ति निवृत्तींकडे |जागृती स्वप्न हो तुर्या |उन्मनी ज्ञप्ती बोलिजे ||५||
देव हो भक्त हो ज्ञानी |शिवशक्तीच अष्टधा |प्रकुर्तिपुरुषादिक |नाना नामें परोपरीं ||६||

विस्तार मूळमायेचा |किती म्हणोनि सांगणें |नांवरूप जयेचेनी |जाणती जाणते गुणी ||७||
गुणी हो निर्गुणी हो तें |सर्वही सचराचरीं |देवदेव्या जगद्वंद्या |पिपिलिकाची विहंगमु ||८||

आगमी निगमी आहे |नानारूपीं विराजती |वाढवी मोडवी पाळी |निर्दाळी आपआपणा ||९||
होतें जातें पुन्हा होतें |विचित्र न कळे कळा |ते कळा अंतरीं जागे |प्रत्यक्ष न दिसे जना ||१०||

सर्व कर्तव्यता तेथें |येथें संदेह नाडळे |विरंची देव इंद्रादी |देवदेव्या बहुविधा ||११||
तीवीण जाणता कैंचा |पाहो जातां भुमंडळीं |सर्व शास्त्रमयी देव्या |सद्विद्या ब्रह्मयोगिनी ||१२||

कार्यकारणकतर्ृत्वे |हेतुः प्रकृति जाणिजे |कर्म उपासना ज्ञानी |तत्त्वज्ञी योगधारणा ||१३||
मुळीं ते येकली जाली |इश्वरु बोलिजे तिये |देवत्रये जयेचेनि |पुढें ब्रह्मांड जाहले ||१४||

त्रैलोक्य सर्वब्रह्मांडीं |उत्पत्ती होत जातसे |येकांशें पाळिते सर्वै |नाना स्थानीं भुमंडळीं ||१५||
कल्पना वासना काया |कायामाया परोपरीं |नेणणें आडवे केलें |जेथें तेथें कळेचिना ||१६||

द्रव्य तें भूमीचें पोटीं |उदंड दाटलें असे |लोक ते पावती मृयु |द्रव्य तेथेंचि राहिलें ||१७||
भाग्यानुसार तें द्रव्य |भूमीमध्येंचि ठेविलें |नेणणें आडवें केलें |दरिद्रें लोक पीडिले ||१८||

पोटानें गांजिले प्राणी |मृत्यूनें मारिले सदा |नेणती हीत तें कैसें |कांहीं केल्या कळेचिना ||१९||
नेणणें आडवें केलें |ज्ञान पैलाड राहिलें |व्यासंगें भुललें प्राणी |बुद्धियोग कळेचिना ||२०||

शब्दार्थ ----

भावार्थ ---


हे श्रीसमर्थांचं लघुकाव्य अर्थात लघुअध्यात्म प्रकरण आहे. यात पाच समास आहेत किंवा पाच योग आहेत. त्यापैकी पहिला आहे अंतरकळा योग यात श्री समर्थ शारदेला वंदन करतात. यात मायेचे वर्णन आहे. शिक्षण शास्त्रात किंवा अध्यापनात ज्ञातांकडून अज्ञाताकडे स्थूल कडून सूक्ष्माकडे असं जाण्याची पद्धत आहे पण अध्यात्म शास्त्र त्याच्या उलट आहे. सृष्टीची निर्मिती जाणून घ्यायची असेल तर सूक्ष्मांकडून स्थूलाकडे किंवा अव्यक्ताकडून व्यक्ताकडे जावं लागतं आणि त्यासाठीच पंचीकरण समजून घ्यावे लागते. तोच या लघुअध्यात्म प्रकरणाचा विषय आहे. परब्रह्म परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे त्यात शुद्ध स्फुरण निर्माण झाले, ते शुद्ध स्फुरण म्हणजे मूळमाया, शारदा , ब्रह्मसूता आणि तीच वेदांची जननी. आता तिचा आणि पंचीकरणाचा काय संबंध आहे ?असा प्रश्न पडेल. पंच म्हणजे पाच, पाच महाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. यापैकी प्रत्येकाचा कमी जास्त भाग घेऊन त्या मिश्रणाने नवीन पदार्थ तयार होणे म्हणजे पंचीकरण ही प्रक्रिया. माया म्हणजे ईश्वराची शक्ती होय. हीच सृष्टी निर्माण करते. अंतरकळा योग मध्ये पहिल्याच ओवीत समर्थ म्हणतात - जगाची जाणती ज्योती म्हणजेच जगतज्योती. तिच्यामुळेच देव मानव दानव गंधर्व इत्यादी या सृष्टीत राहतात ऋषी ,मुनी, तपस्वी ध्यान करू शकतात, तप करू शकतात. बुद्धीचे निरनिराळे पैलू म्हणजे चाळणा ,स्फूर्ती, चतुराई, स्मृती, सद्बुद्धी, कुबुद्धी, सदविद्या हे सगळं काही शारदेमुळेच प्राप्त होते. चार खाणी ( स्वेदज, जारज,उदभिज आणि जरायुज ) चार वाणी ( परा, पश्चन्ति, मध्यमा आणि वैखरी ) इत्यादी सर्व काही तिच्यामुळेच आहे. बोलण्याला ,चालण्याला विचार करण्याला किंवा अगदी मौन राहायला सुद्धा तीच प्रवृत्त करते परमार्थ मार्गे ज्याला जायचे आहे त्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे, दृश्य सृष्टीकडून अदृश्य मूळमायेकडे आणि मग तिलाही ओलांडून परब्रह्म जाणायचेआहे अर्थातच प्रवृत्ती कडून निवृत्तीकडे जायचे आहे .जागृती ,स्वप्न, सुषुप्ती आणि तूर्या या अवस्थांकडून उन्मनी या आत्मज्ञान प्राप्तीच्या अवस्थेकडे तीच नेते. हा झाला मूळ मायेचा विस्तार . तिच्यामुळेच सर्वांना नामरूप मिळते .मूळमाया सर्वत्र चराचरात भरून राहिली आहे ती सगुणात आहे ,निर्गुणात आहे ती वेदातही आहे. मुळात ती एकटीच आली आणि मग ब्रह्मा, विष्णू महेश, सर्व देवता त्रिलोक हे सारं काही तिनेच निर्माण केलं. लहान मुले पत्त्याचा बंगला करतात मुली भातुकलीचा खेळ मांडतात आणि मोडतात बंगला मोडतो तो पुन्हा करतात भातुकलीचा खेळ पसरला मोडला तरी तो पुन्हा मांडतात !तसाच हा मायेचा खेळ आहे. कल्पना वासना संकल्प सार काही तीच निर्माण करते आणि अज्ञानही तीच पसरवते ( नेणणे आडवे केले १६ वी ओवी) काही मंडळी ग्रंथ वाचतात अध्ययन करतात .पण ते मायेच्या जाळ्यातच गुरफटतात. त्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार होतो मी पंडित, मी विद्वान, मी सगळं जाणतो असंच त्यांना वाटतं. पण ते (असे विद्वान) मायेला ओलांडून पलीकडे जात नाहीत. ही मायाच मनुष्याला स्व-स्वरूपापर्यंत जाण्यास सहाय्य करते. परब्रह्म हेच आपले स्वस्वरूप आहे. ते आपल्यातच आहे, पण याच शाश्वत आनंदाचा अमूल्य ठेवा ओळखू शकत नाही, त्याला तो उमगत नाही. तो दृश्य जगात वस्तूत आनंद शोधतो, पण हाती काहीच लागत नाही. फक्त जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, हाती काहीच लागत नाही. भाग्य असेल तरच हा ठेवा प्राप्त होतो. या मायेचा प्रभाव एवढा असतो की मनुष्य तिच्या खेळातच कोळ्याच्या जाळ्यात अडकावे तसा गुरफटून जातो. म्हणूनच समर्थ म्हणतात - नेणणे आडवे केले , ज्ञान पैलाड राहिले . व्यासंगे भुलले प्राणी, बुद्धियोग कळेचिना (ओवी २०).