जय जय सद्गुरु गोसावी |मज जें आठवलें जीवीं |
ते ते पुसेन फेडावी |आशंका माझी ||१||
शिष्य बोले लडिवाळपणें |म्यां संसार घेतला कोण्या गुणे |
मज हे दुःख भोगणें |किंनिमित्त घडे ||२||
विषयलोभें भगवंता |नेणोनि जालासी दुःखिता |
तेणें गुणें मागुता |आलासी जन्मा ||३||
तरी हा जन्म कैसा तुटे |मज भगवंत कैं भेटे |
भवसागर वोहटे |कोण्या गुणें ||४||
जन्म तुटे संतसंगें |देव भेटे अंतरंगें |
दृढभक्तीचेनि योगें |भवसिंधु आटे ||५||
दृढ भक्ति करूं कैसी |काय धरावें मानसीं |
सांगा स्वामी अज्ञानासी |मार्ग कांहीं ||६||
सद्गुरूसी जावें शरण |मनीं धरावें वचन |
तेणें तुझें अज्ञान |जाईल बापा ||७||
सद्गुरु कैसा ओळखावा |तो मज दातारें सांगावा |
कवण उपदेश घ्यावा |तयापाशीं ||८||
ऐकें सद्गुरु लक्षण |क्रियेसह ब्रह्मज्ञान |
आशारहित निरभिमान |तया मोक्ष मागावा ||९||
मोक्ष कवणासि म्हणावें |हें मज स्वामींनीं सांगावें |
दयासिंधु देवाधिदेवें |उपेक्षूं नये ||१०||
अधिकाराविण सांगणें |अलभ्य होय तेणें गुणें |
म्हणोनि आधी शहाणे |अधिकार पाहाती ||११||
त्या अधिकाराची खूण |मज करवावी श्रवण |
ऐक बापा लक्षण |अधिकाराचें ||१२||
जेथें विश्वास विरक्ती |नाहीं संसारीं आसक्ती |
ज्या आवडे गुरुभक्ती |अंतरापासुनी ||१३||
तें अधिकाराचें स्थळ |ज्ञान उपतिष्ठे प्रांजळ |
फिटे भ्रांतीचें पडळ |सद्गुरुबोधें ||१४||
स्वामी पतितपावन |ऐकोनि आलों शरण |
न विचारितां दोषगुण |मज बोध करावा ||१५||
ऐका बोधाचें लक्षण |बोध मागसी तूं कोण |
पाहें आपली ओळखण |आपणामध्यें ||१६||
तुझें शरीर चालवितो |कवण तुज बोलवितो |
सकळ कळा जाणवितो |तो कोण आहे ||१७||
अंतरीं शरीर चालविता |तो येक देव पाहतां |
आत्माराम निघोनि जातां |देह पडे ||१८||
आत्मा निघोनि गेला |देह अचेतन पडला |
अचेतनीं आत्मा व्यापिला |आह कीं नाहीं ||१९||
आत्मा निबिड पूर्णपणें |ऐसें बोलती शाहाणे |
तेणें असे स्थळ उणें |हें तों न घडे ||२०||
शिष्य विचारूनि बोले |देहीं काय निघोनि गेलें |
शरीर अचेतन पडलें |कोण्या गुणें सांग पां ||२१||
शिष्य विचारूनि अंतरीं |म्हणे प्राण प्रयाण करी |
प्राण नसतां शरीरीं |चेतना नाहीं ||२२||
तंव बोले गुरुराव |प्राण वायूचें नांव |
तया वायूतेंचि देव |म्हणतोसी ||२३||
शिष्य बोले जी भगवंता |बहूत बोलती ऐसी वार्ता |
परमात्मा देह चालविता |तेणेंविण अचेतन ||२४||
विचारें पाहतां देह वाव |चाळितयासी कैंचा ठाव |
हा इतर दृष्टीचा स्वभाव |आत्मा चाळक ऐसा ||२५||
आत्म्यासी चाळकपण |हे तों निर्गुणासी गुण |
बळेंचि लाविती ते खूण |चुकले आत्म्याची ||२६||
निर्गुणापासोनि चराचर |जाले सृष्ट्यादि व्यापार |
ऐसें बोलती अपार |ज्ञाते पुरुष ||२७||
माया सत्य जया वाटे |त्याचें ज्ञान परम खोटें |
माईक दृष्टीनें भेटे |परमात्मा केविं ||२८||
माया मिथ्या कैसी म्हणावी |प्राणिमात्रासी वेड लावी |
सकळ रूप आपुलें दावी |प्रत्यक्ष आतां ||२९||
प्रत्यक्षास प्रत्यक्ष दिसे |अप्रत्यक्ष कोठे असे |
अप्रत्यक्षेंविण नसे |पूर्ण समाधान ||३०||
पूर्ण समाधान कोण |मायामिथ्या लक्षण |
ऐसें मज निरूपण |केलें पाहिजे ||३१||
अभिन्न तेंचि समाधान |मायेचें मिथ्या लक्षण |
आत्मनिवेदनीं खूण |पावसी बापा ||३२||
सद्गुरुवचन अंजन ल्याला |माया भयानक न दिसे त्याला |
अभिन्नपणें आत्मयाला |सर्वत्र देखे ||३३||
सर्वत्र आत्मा देखे कवण |ऐसा केला शिष्ये प्रश्न |
ह्या प्रश्नाचें लक्षण |ऐसें असे ||३४||
देखे तोही जाण आत्मा |सर्वांतरीं जो सर्वात्मा |
ज्याच्या स्वरूपासि उपमा |देतांचि न ये ||३५||
निरुपम जो निर्गुण |जाणपणा हे तों गुण |
म्हणोनि सगुणनिर्गुण |जाणिजे आत्मा ||३६||
सगुण निर्गुण पुसे काय |आत्मा नेमिला न जाय |
नेमातीत असंभाव्य |भाविला न वचे ||३७||
जो नातुडे भावनेसी |त्याची प्राप्ती घडे कैसी |
ऐसा आक्षेप स्वामीसी |शिष्यें केला ||३८||
त्याची प्राप्ती त्यासी घडे |येरां सर्वथा नातुडे |
जयाचें वेगळेपण मोडे |तोचि आत्मा ||३९||
जो गगनाची गवसणी |गवसणीचाही धनी |
धनीपणाची कडसणी |जेथें नाही ||४०||
जें ब्रह्मांडापैलिकडे |मनबुद्धीसी नातुडे |
जेथें चपळपण मोडे |बापुड्या मनाचें ||४१||
त्याचे शेवटीं तेच आहे |आपुला अंत होवोनि राहे |
आतां पैलपार पाहें |तेंचि अवघे ||४२||
चहूंकडे सारखेंचि |येकजिनसीं आपणचि |
अमूप सीमा स्वरूपाची |करितां नये ||४३||
जेथें मनाची धांव पुरे |पैलीकडे उदंड उरे |
मन माघारें फिरे |आले वाटे ||४४||
पाहूं जाय जे दिशेसी |ती घालोनि पाठीशी |
सन्मुख धांवे प्रयासी |अंत न लगे ||४५||
अष्ट दिशा पाहोनि आलें |मग तें ऊर्ध्वपंथें उडालें |
गगन भेदोनियां गेलें |पैलिकडे ||४६||
बहूत लंघिली पोकळी |भोंवतें फिरे अंतराळीं |
ऊर्ध्वमुखें तये वेळीं |अवलोकितें जालें ||४७||
निरावलंब वेगळें |सूक्ष्म रूप तें पांगुळें |
असंभाव्य देखोनि गळेे |आवांका पोटीं ||४८||
आलें आपुले स्थळीं |बुडी मारिली पाताळीं |
सप्त पाताळाचे तळीं |अंत पाहे ||४९||
तें अत्यंत सखोल |बुडी दिल्ही बहुसाल |
ठाव नाहीं व्याकुळ |ऐसें जालें ||५०||
तेथोनियां उफाळे |ऊर्ध्वमुखें अंतराळें |
बहू शिणलें नकळे |अंत स्वरूपाचा ||५१||
स्वरूपार्णव फिरून आलें |तेणें बहुत निर्बुजलें |
हीन होवोनी पडलें |अचेतन ||५२||
गेलें ज्याच्या शुद्धीसी |पाहे तें आपणासी |
तैं विस्मित मानसीं |आश्चर्य करी ||५३||
जया इतुकें धुंडिलें |तें जवळचि देखिलें |
आपणा पाहों गेलें |तेंचि आपण ||५४||
लवण सिंधू जालें |तैसें स्वरूपीं विरालें |
तेणें गुणें जोडलें |धनासी धन ||५५||
ऐसी स्वरूपाची स्थिती |स्वानुभवी जाणती |
हे वस्तूची प्राप्ती |सद्गुरुबोधें ||५६||
ऐसें हें स्वरूपज्ञान |याहीपर समाधान |
त्या साक्ष आपुलें मन |अनिर्वाच्य तें ||५७||
जो स्वयें तृप्त जाला |तो सर्वांगें निवाला |
निःशब्दीं स्वानंदला |सांगतां न ये ||५८||
जें सांगतां न ये बोलें |तें बोलेंचि प्राप्त जालें |
गुरुकृपेच्या सखोलें |अगाध वचनें ||५९||
गुरुवचनीं विश्वास |धरितां तुटे भवपाश |
विनवी रामीरामदास |लडिवाळपणें ||६०||