विषयप्रवेश

श्रीसमर्थ या लघुकाव्यात अतिशय क्लिष्ट विषय, खूप सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतात,
त्यामुळे आपल्या मनातील संकल्पना, शंका लगेच दूर होतात, थोडक्यात आपण निःशंक होतो.
हे काव्य गुरू-शिष्यांचा संवाद आहे. याचे वाचन करताना जाणवते की " हे माझेच प्रश्न आहेत ".
त्याचे निरसन वाचताना मन त्यातच रंगून जाते, रममाण होते, यात शंकाच नाही. हे प्रश्न कोणालाही पडू शकतात,
मग तो पारमार्थिक असो वा नसो. विचारांना चालना नक्कीच मिळते. हे काव्य अभ्यासताना भगवतगीता आठवते.
भगवान श्रीकृष्णाला सतत प्रश्न विचारणारा अर्जुन आठवतो. असे हे काव्य प्रत्येकाने जरूर जरूर अभ्यासावे.

*** भाग १ ***

हे लघुकाव्य म्हणजे गुरू-शिष्यांचा संवाद आहे. शिष्य आपल्या गुरूंना प्रश्न विचारून शंका निरसन करून घेत आहे.
याठिकाणी शिष्याचे प्रश्न आहेत, असे असले तरी ते सर्व प्रश्न आपल्याच मनातील आहेत.
पहिलाच प्रश्न असा की " माझा जन्माचे कारण काय ?" दुसरा प्रश्न " मला जन्म घेतल्यावर दुःखाचे कारण काय?"
याचे उत्तर असे -- मनुष्य जन्म हा फक्त आणि फक्त ईश्वरप्राप्तीसाठी म्हणजेच स्वस्वरूप जाणून घेण्यासाठी आहे.
अन्य कशासाठीही नाही. तरीसुद्धा देहबुद्धीमुळे मनुष्याचे मन विषयात गुंतते. हे विषय देहाचे असतात - शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध.
हे विषय पाच कर्मेंद्रियांचे आहेत. ही कर्मेंद्रिये देहाचीच आहेत. म्हणजेच हा देह हे विषय भोगण्याच्या मागे धावतो आणि ईश्वराला विसरतो.
आणि ईश्वर हवा असतो पण फक्त विषयांची पूर्तता करण्यासाठी. ईश्वरासासाठी ईश्वर नको. जर पूर्तता झाली तर आनंद अन्यथा दुःख.
आनंद मिळतो ती सुद्धा क्षणिक ! याच्या प्राप्तीसाठी मनुष्य कर्म करतो. कर्म केल्यावर साहजिकच कर्मफळे तयार होतात.
मग ती भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. या सर्व गोष्टींचे वर्णन दासबोधात आढळते.
मग हा जन्मच नको असेल तर काय करावे ? कोणती कृती केली की भगवंत प्राप्ती होते ?
या जन्मदुःखाच्या फेऱ्यातून सुटका कशी करून घ्यायची ? या गोष्टी हव्या असतील तर संतांची संगत धरावी, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष.
म्हणजेच देहाने अथवा त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा, त्यावर चिंतन-मनन करावे आणि त्यांच्या उपदेशानुसार आचरण करावे.
तसे केले असता आपल्यातील ईश्वर प्रकट होतो. परंतु यासाठी भक्तिभाव हवा, संतांच्या वचनावर विश्वास हवा.
तर आणि तरच हा भवसागर आपण पार करू शकतो.
मग दृढभक्ती कशी करायची ? यासाठी सद्गुरूंना शरण जावे. त्यांनी केलेल्या उपदेशानुसार वर्तन करावे.
तसेच सद्गुरूचरणी अनन्य भाव हवा, संपूर्ण शरणागती हवी. अहंचा त्याग हवा. तरच समाधान प्राप्त होते.
आता हे ऐकून शिष्य खूप महत्वाचा प्रश्न विचारतो -- " सद्गुरूंना कसे ओळखावे ?" " त्यांच्याकडून कोणता उपदेश घ्यावा ?"
श्रीसमर्थ सांगतात जो प्रत्येक क्रिया कर्तेपण विसरून ईश्वराच्याअनुसंधान करतो,
ज्याचे कर्म कर्तुत्वभिमानरहीत असते म्हणजेच निष्काम कर्म असते तो सद्गुरू !

दासबोधात श्रीसमर्थ सद्गुरूंची व्याख्या पुढीलप्रमाणे सांगतात --
मुख्य सद्गुरूंचे लक्षण ।
आधी पाहिजे विमळ ज्ञान ।
निश्चयाचे समाधान ।
स्वरूपस्थिती ।।
( दासबोध ५-२-४५ )

अशा सद्गुरूंपाशीच मोक्ष मागावा.
मोक्ष म्हणजे काय ?मोक्ष कोणाला म्हणावे ? मोक्षप्राप्ती ही सहज घडणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी अधिकार लागतो,
मनाची परिपक्वता हवी, सहज घडणारी ही गोष्ट नव्हे. यासाठीची अर्हता म्हणजे सद्गुरूंवर विश्वास,
विरक्ती, संसारात अनासक्ती आणि सद्गुरूंविषयी सेवाभाव. असे असेल तरच अधिकार प्राप्त होतो.
यानंतरच सद्गुरू बोध करतात, अनुग्रह करतात, परिणामी भ्रम नाहीसा होतो, दृश्यजगातून मन बाहेर पडते व दृश्य जगाच्या मिथ्यत्वाची जाणीव होते.

पुढे श्रीसमर्थ "आत्मा" या विषयावर विस्तृतपणे मांडणी करतात. आत्मा म्हणजे काय ? तो कुठे रहातो ? मृत्यूसमयी काय होते ? आत्म्याचे स्वरूप काय ?
यासर्वांचे वर्णन आपण पुढील भागात पाहू.


शब्दार्थ
१. नेणोंनी - अज्ञानाने
२. वोहटे - आटणे
३. वाव - मिथ्या, निरुपयोगी
४. नेमातीत - पलीकडे
५. नातुडे - न जाणणे
६. येरा - दुसरा
७. कडसणी - विचार
८. अमूप - मोजता न येण्याजोगे
९. निरावलंब - स्वतंत्र
१०. स्वरूपार्णव - स्वरूप + अर्णव, स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, अर्णव - समुद्र
११.निर्बुजणे - घाबरणे, अनुर्वाच्य हो