सकळ संत साधुजन |भूत भविष्य वर्तमान |
तयां सकळांसी नमन |साष्टांगभावें ||१||
जालें सकळांसी नमन |नमस्कारोनि श्रोतेजन |
आतां कथानुसंधान |सावकाश ऐका ||२||
जुनाटपुरुषाची कथा |नेमस्त मिळवी परमार्था |
जीसमागमें महत्तीर्था |पाविजेतें ||३||
पावनाचेनि तारूं |लंघोनि जाय सागरू |
श्रवणें तैसा विश्वंभरू |पाविजेतो ||४||
जाणीवेरहित ज्ञानी |तोचि योग्य निरूपणीं |
जैसा क्षुधित भोजनीं |तृप्त होय ||५||
बहुसाल व्युत्पत्ती आली |कां बुद्धी तीक्ष्ण जाली |
तरी समाधानाची किल्ली |वेगळीच आहे ||६||
ती कैसी आहे सांगा स्वामी |ऐसा आक्षेप केला तुम्हीं |
सुचित होवोनि अंतर्यामीं |ऐका सांगतों ||७||
नव्हे रे टम काहाणी |दाटून लावूं लावणी |
चंचळ मनें श्रवणीं |बैसों नये ||८||
जें सावधास न कळे |तें चंचळा कैसें कळे |
ज्ञानेंसहित मावळे |विज्ञान जेथें ||९||
हातींचें रत्न जळीं गेलें |खडूळ होतां तें नाढळे |
निवांत जळ निवळे |तरीच लाभे ||१०||
तैसे शुद्ध निरूपण |एकाग्र करावें श्रवण |
तेणेंकरितां बाणे खूण |समाधानाची ||११||
होतां अद्वैतनिरूपण |पडे देहाचें विस्मरण |
ऐसें एकाग्रलक्षण |श्रोतयांचें ||१२||
वृत्ति स्वरूपीं भरे |आपेंआप विस्तरे |
येक नसतां दुसरें |आठवेल कैंचें ||१३||
जेव्हां आपुला ध्यास तुटे |आशंकामात्र तेव्हां फिटे |
मग समाधान लिगटे |बळेंचि अंगीं ||१४||
शब्द ठाकोनि अंगीं |अर्थी धावों लागे वेगीं |
दृढ अर्थाचे संगीं |निःसंग होय ||१५||
अहं सोहं आपण |याहीवेगळे मीपण |
मीपण गेलिया खूण |समाधानाची ||१६||
समूळ अहंता विराली |ही समाधानाची किल्ली |
जेथें वित्पत्तीसीं निमाली |तीक्ष्ण बुद्धी ||१७||
बुद्धी जाऊं न पवे जेथें |वित्पत्ती काय करी तेथें |
सद्गुरुकृपेचें भातें |अंगीं भरलें पाहिजे ||१८||
स्वरूपज्ञान जया झालें |त्याचें निर्मूळ नाहीं जालें |
तोंवरी समाधान जालें |घडेना सर्वथा ||१९||
असो हें बोलणें आतां |अवधान द्यावें श्रोतां |
जुनाट पुरुषाची कथा |सांगिजेल ||२०||
सकळांचा महापुरुष |जो ब्रह्मादिकांचा ईश |
शिवादिक असती अंश |तो हा अनामी ||२१||
सकळ सृष्टीचा व्यापक |जो मूळमायेचा जनक |
तो हा पुरुष कोणीएक |बहु दिवसांचा ||२२||
जयाचे आज्ञेप्रमाणें |ब्रह्मादिकास वर्तणें |
चंद्र सूर्य तारांगणें |जयाची सत्ता ||२३||
मही अचळ मेघमाळा |नाना सरितासिंधूजळा |
मर्यादा चाले अवलीळा |जयाचेनी ||२४||
ऐशा ब्रह्मांडमाळा अनंत |इच्छामात्रें होत जात |
तरी जयाचा येकांत |मोडलाच नाहीं ||२५||
आपण येकला सर्वकाळ |कन्या खेळे नाना खेळ |
येकटी असे लडिवाळ |नाना छंदें ||२६||
तये गलबला नावडे |म्हणोनि खेळे एकीकडे |
ब्रह्मादिक केले वेडे |तये कुमारीनें ||२७||
अनंत ब्रह्मांडें उतरंडी |खेळ मांडला परवडी |
काळ करी कडाफोडी |पुत्र तयेचा ||२८||
शीण पावे कुमारी |नावेक निद्रा करी |
तेणें खेळाबाहेरी |होवोनि जाय ||२९||
परम सुलक्षण |राहिना पित्याविण |
पिता तियेचा निर्गुण |माता असेना ||३०||
ते क्षणीं उठोनि पाहे |तों खेळ मोडिला आहे |
पुनरपि लवलाहे |खेळ मांडी ||३१||
ऐशी निरंजनीं एकट |करी खेळाची खटपट |
खेळ खेळतां वीट |मानूं नेणे ||३२||
खेळ मांडिला विचित्र |उतरंडीचें एक पात्र |
तें हें ब्रह्मांड स्वतंत्र |जाणिजे तुवां ||३३||
खेळ खेळे महा सबळ |अत्यंत वाढली प्रबळ |
वेड लाविलें सकळ |प्राणिमात्रासी ||३४||
नकळे तयेचें लाघव |बहुत पडिले मानव |
पात्रीं सांठविले जीव |कोट्यानुकोटी ||३५||
बहुत लोभाची आवडी |घातली इच्छेची बेडी |
ऐशा बहुत उतरंडी |संपूर्ण केल्या ||३६||
प्राणी जाऊं नेदी बाहेरी |जिववून मागुते मारी |
चुकों नेदी वेरझारी |वासनासूत्रें ||३७||
बहुत प्राणी केले गोळा |लाविला विषय टकळा |
तेणें येती पूर्वस्थळा |स्वेच्छें प्राणी ||३८||
ऐसें गोविलेच गोवी |मारून मागुता जन्म दावी |
तयेपासून सोडवी |तो विरळा कोणी ||३९||
पळोन जावें दिगंतरा |तेथें आहे ते सुंदरा |
त्या सांगातीं दुसरा |कोणीच नाहीं ||४०||
संतान वाढलें लक्षवरी |तरी ते ठाईंची कुमारी |
नांव ठेवितां उदरी |पिता आला ||४१||
पिता उदरास आला |तरी तो नाहीं जन्मला |
भर्ता स्वयें आपुला |होवोनि ठेली ||४२||
भ्रतारास प्रसवली |मग ती माय राणी जाली |
सासू माता आपुली |आपणचि ||४३||
वायु फुंकोन केला वन्ही |पोटीं लाविलें पाणी |
आपापासून धरणी |कळों आली ||४४||
ऐसी खेळास गुंतली |तेणें पिता विसरली |
ते पाउलीं मुरडली |मागुती मागें ||४५||
जन्मभूमी वास पाहे |बाप म्हणोनि आस बाहे |
मागुती निवांत राहे |स्तब्ध होवोनी ||४६||
पिता न दिसे डोळां |म्हणोनि शोक करी बाळा |
भोंवती पाहे वेळोवेळां |अष्ट दिशेतें ||४७||
वेध पित्याचा लागला |मग खेळ मोडोनि गेला |
उतरडी फोडून पळाला |काळपुत्र ||४८||
पिता पाहतां खेळ मोडे |खेळ पाहतां पिता दडे |
पाहाती झाली दोहींकडे |उभी राहोन ||४९||
मग ते लोभें झळंबली |पित्याकडे चालली |
खेळ विसरोन गेली |जन्मस्थाना ||५०||
आपणा विसरोन पाहे |तंव पिता पुढें आहे |
ऐसें देखोन लवलाहें |भेटती जाली ||५१||
पिता तापसी जैसा वह्नी |तया निःसंगाची मिळणी |
कन्या नासली तत्क्षणीं |पित्यादेखतां ||५२||
तंव पिता झळंबला |कंठ सद्गदित जाला |
म्हणे आज संग सोडला |कुमारीनें ||५३||
ऐसा नावेकवरी |विलाप पिता करी |
पाहे तंव अभ्यंतरीं |कन्या उभी ||५४||
मग तयेसी भेटला |उभयतां आनंद जाला |
मागुता खेळ मांडला |तये कुमारीनें ||५५||