श्रीसमर्थ रचित लघुकाव्यातील हे एक लघुकाव्य. हे काव्य म्हणजे एक गोड रसाळ कथा आहे. ब्रह्माडनायक परब्रह्माविषयीची ही कथा आहे.
विश्वनिर्मिती कशी होते आणि तिचा ऱ्हास म्हणजेच उभारणी आणि संहारणी कशी होते हे अतिशय सोप्या भाषेत श्रीसमर्थ गोष्टीरूपाने सोपे करून सांगतात.
हे काव्य वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की श्रीसमर्थ उत्तम शिक्षक आहेत.

परब्रह्म हे " आद्य " म्हणून या काव्याचे नाव " जुनाटपुरुष ". पुरुष हा शब्द कर्ता या अर्थाने आहे.
ही कथा का ऐकावी ? त्याने काय प्राप्त होणार आहे ? याचे उत्तर आपल्याला या काव्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणात मिळते.

जुनाटपुरुषाची हे कथा ।
नेमस्त मेळवी परमार्था ।
जैसा मार्ग महत्तीर्था ।
पविजेत आहे ।। ३ ।।
नातरी पवनाचेनि तारु ।
लंघित जाय सागरू ।
श्रवणे तैसा विश्वभरू ।
पाविजेत आहे ।।
ही कथा परमार्थमार्ग प्रशस्त करते, जणू काही आपण पवित्र तीर्थक्षेत्री जात आहोत.
ज्यानुसार शिडात वारा भरला की नौका सागर पार करते, त्यानुसार य कथेचे श्रवण केले तर आपण ह भवसागर ईश्वरकृपेने पार करू शकतो.

प्रत्येक ग्रंथाला अनुबंधचतुष्ट्य असते. यात विषय, संबंध, प्रयोजन आणि अधिकारी या चार गोष्टींचा समावेश होतो.
त्यानुसार हे काव्य अथवा कथा कोणासाठी आहे ? ती कोणी ऐकावी ? त्याने काय प्राप्त होणार आहे ? याचे प्रतिपादन श्रीसमर्थ सुरवातीलाच करतात --
जाणीव रहित आत्मज्ञानी ।
तो चि योग्य निरुपणी ।
जैसा क्षुधिस्त भोजनी ।
तृप्त होय ।। ५ ।।
ज्याला आत्मज्ञान नाही परंतु तो शाश्वत आनंदासाठी धडपडत आहे, अशा माणसासाठी म्हणजेच मुमुक्षु व्यक्तीसाठी ही कथा आहे.
ज्यानुसार भुकेलेल्याला उत्तम सुग्रास भोजन मिळाल्यावर तो भोजन करून तृप्त होतो, त्यानुसार ही कथा ऐकल्यावर मुमुक्षु तृप्त होतो, शांत होतो. मुमुक्षु कोणाला म्हणावे ?
ज्याचे थोरपण लाजे ।
जो परमार्थाकारणे झिजे ।
संतापाई विश्वास उपजे ।
या नाव मुमुक्ष ।।
( दासबोध ५.८.४२ )

कथा म्हटली की वक्ता आणि श्रोता दोघेही हवेच. या कथेतील श्रोता व्यावहारिक दृष्ट्या, लौकिकार्थाने खूप ज्ञानी आहे.
पण समाधान नाही. अशी या कथेतील श्रोत्याची अवस्था आहे.
बहुसाल वित्पत्ती आली ।
कां ते बुद्धी तीक्ष्ण जाली ।
परी समाधानाची किल्ली ।
ते वेगळीच आहे ।। ६ ।।

लौकिक ज्ञान हे कायमस्वरूपी समाधान देऊच शकत नाही. दासबोधमध्ये फक्त याविषयावर विवेचन करणारा समास आहे -- बहुधाज्ञान निरूपण.

जव ते ज्ञान नाही प्रांजळ ।
तव सर्व काही निर्फळ ।
ज्ञानरहित तळमळ ।
जाणार नाही ।।
( दासबोध ५-५-१ )
तळमळ जात नाही, अस्वस्थता आहे. अनेक दिवस भुकेल्या माणसासारखी या मुमुक्षुची अवस्था आहे.
श्रीसमर्थ या काव्यात अशा मुमुक्षुचे वर्णन क्षुधिस्त असे करतात.
असा क्षुधिस्त/ मुमुक्षु या कथेमुळे तृप्त होणार आहे. खऱ्या समाधानाची किल्ली हाती लागणार आहे.
मनुष्य मुळात सच्चीदानंद स्वरूप आहे. परंतु जन्माला आल्याबरोबर तो मायेच्या कक्षेत येऊन समाधान विसरतो.
स्वतः आनंदस्वरूप आहोत याचा विसर पडतो. कालांतराने त्रिविधतापाने पोळल्यावर शाश्वत आनंद, समाधान शोधू लागतो.
मग सद्गुरूकडून अशी कथा ऐकली की मन शांत होते.
कारण ज्यानुसार आरशावरील धूळ पुसल्यावर आरसा लख्ख होतो,
त्यानुसार प्रत्यक्ष सद्गुरुंच्या मुखातून परब्रह्माचे कथारूपस्तवन ऐकल्यावर शिष्य जागा होतो, जागृत अवस्था प्राप्त होते, शाश्वत आनंदप्राप्ती होते.


---
शब्दार्थ

१. वित्पत्ती - विद्वात्ता, शहाणपण
२. ठमकहाणी - बनवलेली/ तयार केलेली गोष्ट
३. खडूळ - गढूळ
४. जनक - वडील
५. बोहरी - नाश
६. उतरंडी - एकावर एक ठेवलेली भांडी
७. झळंबळणे - चमकणे

जय जय रघुवीर समर्थ