संगीत स्थळें पवित्रें | तिकट्या वोळंबे सूत्रे |निवती विस्तिर्ण स्वतंत्रे | उपसाहित्याचीं ||१||
तुळसीवनें वृंदावनें | सुंदर सडे संमार्जनें |ओटे रंगमाळा आसनें | ठांई ठांई ||२||

गवाक्षें दिंड्या खिडक्या मोऱ्या | बंकदर्वार पाहिऱ्या |सोपे माड्या ओहऱ्या | ठांई ठांई ||३||
ध्वज गोपुरें शिखरें | भुयारें तळघरें विवरें |मंडप राजांगणें गोपुरें | दारवंटे ढाळजा ||४||

देवालयें रंगशिळा | चित्रविचित्र दीपमाळा | पोहिया पादुका निर्मळा | आड बावी पुष्कर्णी ||५||
विशाळ तळीं सरोवरें | मध्ये तळपती जळचरें |ब्रह्मकमळें मनोहरें | नाना रंगें विकासती ||६||

गोंमुखें पाट कालवे | साधूनि बांधूनि आणावे |स्थळोस्थळीं खेळवावे | नळ टाकीं कारंजीं ||७||
पुष्पवाटिका वृक्ष बनें | नानाप्रकारचीं धनें |पक्षी श्वापदें गोधनें | ठांई ठांई ||८||

सभामंडप चित्रशाळा | स्वयंपाकगृहें भोजनशाळा |सामग्रीगृह धर्मशाळा | मठ मठ्या नेटक्या ||९||
एकांतगृहें नाट्यशाळा | देवगृहें होमशाळा |नाना गृहें नाना शाळा | नानाप्रकारीं ||१०||

ऐसीं स्थळें परोपरी | नाना युक्ती कळाकुसरी |नि:काम बुध्दी जो करी | धन्य तो साधु ||११||

शब्दार्थ ----

तिकट्या - विशिष्ट पद्धतीने एकत्र जुळवलेल्या तीन काठ्या.
दिंडी - मोठया दरवाजाला केलेली लहानशी झाप.लहान दरवाजा.
सोपा ओवऱ्या - ओसरी.(वाड्याच्या चार दिशांना लांब सोपे/ओवऱ्या असणे म्हणजे चौसोपी वास्तू).
दारवंटा - उंबरठा.
बावी - विहीर.
पुष्करिणी - आतून तळापर्यंत पायऱ्यांची विहीर.
बंक - चौकी.
पोहिया - पाणपोई.

भावार्थ ---


मानसपूजेसाठी स्थळ कसे असावे, याचा एक आदर्श नमुना या पहिल्या समासातील 'स्थळ' वर्णनावरून नजरेत भरतो. अकरा ओव्या असलेल्या या पहिल्या समासामध्ये जणू समर्थांनी चाफळचे मनोहर रूप वर्णन केले आहे. हे स्वरूप त्याकाळी समर्थांनीच चाफळला प्राप्त करून दिले होते असे म्हटले जाते. समासाच्या अखेरच्या ओवीत म्हटल्याप्रमाणे' ऐसी स्थळे परोपरी | नाना युक्ती कळाकुसरी | निष्काम बुद्धीने करी | धन्य तो साधू|| हे वर्णन समर्थांना साजेसे आहे. परमेश्वराचे वास्तव्य असलेले मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर याचे चित्र समर्थांनी या समासातून डोळ्यापुढे उभे केले आहे. ही मंदिरे ज्या ठिकाणी बांधली आहेत ते स्थान अतिशय पवित्र आणि संगीत आहे. (संगीत म्हणजे यथायोग्य स्थान असा इथे अभिप्रेत असलेला अर्थ) बांधणी साठी लागणारी इतर साधनसामुग्री म्हणजे तिकट्या, वोळंबे ,सूत्रे.. यांचा योग्य वापर केल्यामुळे पाहताना हे स्थान समाधान देते. तिकट्या म्हणजे तीन काठ्या वापरून केलेली रचना. ओळंबा म्हणजे दोरीला वजन लावून गवंडी वापरतात ते साधन तर सूत्र म्हणजे दोरा..! मंदिराच्या प्रांगणातले सडासमार्जन ..रांगोळ्या.. तुळशीवृंदाने..वने.. ठिकठिकाणी बसण्यासाठी केलेले ओटे... या साऱ्या येथील नजरेत भरणाऱ्या गोष्टी..! येथील वास्तूंना खिडक्या ,माड्या, जिने, ओवऱ्या ,सोपे ,ओसऱ्या, पडव्या आणि मोररया सुद्धा आहेत. गोपुरे आणि शिखरे असून त्यावर ध्वज फडकत आहेत. (गोपुरे म्हणजे मजलेदार, नक्षीदार इमारत किंवा नक्षीकाम असलेले नगराच्या मंदिराच्या प्रकारचे महाप्रवेशद्वार .दक्षिण हिंदुस्थानातील ही शिल्प पद्धती आहे या यामध्ये विविध मूर्तींचा ही समावेश असतो.) येथे भुयारे ,तळघरे, विवरे, मंडप आणि प्रशस्त अंगणे आहेत. येथील देवालयांमध्ये देवाच्या मूर्ती समोर दगडी शिळा, विविध प्रकारच्या दीपमाळा आणि निर्मळ अशा पादुका आहेत. पाणपोया.. आड.. विहिरी.. आणि पुष्करणी (पायऱ्या असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत उतरता येईल अशा विहिरी) सुद्धा आहेत. येथे विशाल अशी तळी आणि सरोवरे असून त्यामध्ये विविध प्रकारचे जलचर आहेत. मन वेधून घेणारी ब्रह्मकमळे उमललेली आहेत. पाण्यासाठी गोमुखे ,कालवे पाट बांधलेले आहेत आणि ते पाणी ठिकठिकाणी म्हणजे, नळ ..टाक्या.. कारंजी अशा ठिकाणी खेळविले आहे. ( यातून पाण्याचा निसर्ग संपत्तीचा नेमक्या नियोजनासह योग्य वापर समर्थांनी सांगितला आहे .) अनेक पुष्पवाटिका, नाना प्रकारची वने, मोठे वृक्ष हे निसर्गधन तर पक्षी, प्राणी आणि गाईंसारखे गोधन देखील ठिकठिकाणी आहे. अर्थात या सर्व पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन त्या काळीच समर्थांनी आपल्या कृती मधून दाखविले आहे. चित्रशाळा, भोजन शाळा, धर्मशाळा नाट्य शाळा, यज्ञशाळा, अशा अनेक शाळा तर इथे आहेतच; शिवाय देवघर, स्वयंपाकघर, सामानगृह, एकांतगृह, यासारखी अनेक घरे देखील आहेत. त्याचबरोबर सभामंडप आणि नेटकेपणाने बांधलेले मठ आणि मठ्या आहेत. ही सर्व स्थळे अतिशय कलात्मकतेने तयार केली आहेत. अशा प्रकारचे कार्य निरपेक्ष भावनेने जो करतो तो साधू खरेच धन्य होय. आरंभी उल्लेख केल्याप्रमाणे ही ओवी तंतोतंत समर्थांनाच लागू पडते. साधकाने आत्महितासाठी वैभवशाली अशा वैकुंठ राजाची म्हणजे ब्रह्माडाचा नायक असलेल्या भगवान विष्णूची मानस पूजा करावी असे समर्थ समासाच्या शेवटी सांगतात. मनानेच ज्या गोष्टींची कल्पना करायची, त्या कल्पना विश्वामध्ये जे जे साकारायचे, ते देखील कसे भव्य.. दिव्य.. उदात्त.. विशाल.. असायला हवे हा समर्थांचा व्यापक दृष्टिकोन या सर्व वर्णनामधून प्रत्ययास येतो.