🚩|| मानसपूजा ||🚩

सोळाव्या शतकातील समर्थ रामदास स्वामी हे स्वतःचा स्वतंत्र असा संप्रदाय निर्माण करणारे आगळे वेगळे संत कवी..! बदलता काळ आणि प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांनी समाजाला प्रपंच विज्ञान सांगितले. "संत आणि समर्थ "अशी दोन्ही रूपे त्यांच्या काव्यात बघायला मिळतात. 'ग्रंथरूप' आणि 'स्फूट काव्यरूप' अशी द्विविध स्वरूपाची वांग्मय निर्मिती समर्थांनी केली. त्यामधील 'लघुकाव्ये' हा एक स्वतंत्र प्रकार आहे. समर्थांनी अष्टाक्षरी पाच लघुकाव्ये लिहिली तर ओवीबद्ध अकरा लघुकाव्ये लिहिली असा उल्लेख स.भ. शंकर श्रीकृष्ण देव यांच्या "समर्थ हृदय" या 'समर्थ चरित्र द्वितीय खंड' या पुस्तकात येतो. समर्थांच्या "मानसपूजा" या लघुकव्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ज्या व्यक्तीला आत्मज्ञानाची तळमळ आणि भगवंताच्या भेटीची आस आहे...ओढ आहे... भगवंताविषयी ज्याच्या मनात अतीव प्रेम आहे... त्याला भगवंतप्राप्तीचे अनेक मार्ग अध्यात्म शास्त्रात सांगितले आहेत.

'मानसपूजा' हा देखील भगवंताशी, सद्गुरुशी किंवा आपल्या दैवताशी एकरूप होण्याचा उत्तम मार्ग समर्थांनी सांगितला आहे. श्रद्धा निष्ठा आणि चिकाटी याद्वारे ही मानसपूजा साधता येते. समर्थांनी आपल्या 'मानसपूजा' या लघुकाव्यामधून अकल्पनीय अशी भव्य आणि व्यापक पूजा वाचकाच्या/साधकाच्या डोळ्यासमोर उभी केली आहे. देवघरातला देव्हारा आणि त्यातील मूर्तींचे ताम्हणामधील स्नान, गंध, फुल, नैवेद्य अशी एका विशिष्ट चाकोरीतील आणि मर्यादेतील ही पूजा नाही तर सिंहासनावर विराजमान होणाऱ्या राजाच्या वैभवापेक्षा, अनंतपटीने वैभवशाली असलेल्या ब्रम्हांडनायकाची ही पूजा आहे. चाफळच्या मठात आपल्या शिष्यांकडे जी नित्यनैमित्तिक कर्मे समर्थांनी सोपविली होती, त्याचे वर्णन मानस पूजेत आहे. काव्यामध्ये ही मनाने केलेली पूजा असली तरी समर्थकाली अशी पूजा चाफळ येथे श्रीरामाची प्रत्यक्ष होत असावी असे श्री. शंकर देव यांनी म्हटले आहे.मानसपूजा म्हणजे आपले आराध्य दैवत किंवा आपले सद्गुरु यांची सचेतन मूर्ती मनानेच पहायची... मनाच्याच डोळ्यांनी तिचे दर्शन घ्यायचे... आणि मनानेच तिची षोडशोपचारे पूजा करायची...! हे एक प्रकारचे सूक्ष्म अर्चन...!अर्थात सूक्ष्म अशा सद्वस्तूपर्यंत पोहोचण्यासाठी मन सूक्ष्म व्हायलाच हवे..! त्यासाठी मानसपूजा हा मार्ग ...!! परमार्थात मानसपूजा महत्त्वाची आहे. कारण ही मानसपूजा मनाला स्थूलाकडून सूक्ष्माकडे घेऊन जाण्यास महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळेच अंतर्यामी असलेल्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते आणि हळूहळू ती दृढ होत जाते. भक्ताचे भगवंतावर असलेले प्रेम त्याच्या अनन्यभक्तीतून व्यक्त होत असते. " सा त्वसमि परम प्रेम रूपा" "अमृत स्वरूपा च"*.. अशी महर्षि नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात सांगितलेली भक्ती अमृत स्वरूपाची आहे. शिवाय 'भक्ती' म्हणून श्रीमद् भागवतातील प्रल्हादाची पुढील उक्ती सांगितली जाते. *"श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनं | अर्चनं वंदनं दास्यं साखयमात्म निवेदनम् ||" श्री समर्थांनी दासबोधातून या नवविधा भक्तीचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यातील अर्चन भक्ती सांगताना बाह्य उपचारांनी केली जाणारी पूजा समर्थ सांगतात. पण त्याचवेळी बाह्य उपचार वापरून अशी पूजा घडू शकली नाही तर मनानेच आतमध्ये ती पूजा करायला सांगतात. अशी आपल्या अंतर्यामी मनाने केलेली भगवंताची पूजा म्हणजे "मानसपूजा"..! बाहेरील सर्व उपचार आपल्या कल्पनेने निर्माण करून आतल्याआत ते भगवंताला अर्पण करायचे..! "मने भगवंतास पूजावे | कल्पून सर्वही समर्पावे | मानस पूजेचे जाणावे | लक्षण ऐसे"|| (४.५.३२ दासबोध.)समर्थांचे आराध्य दैवत म्हणजे श्री रामराय..! या रामरायाची 'मानसपूजा' समर्थांनी सांगितली आहे. ब्रम्हांडनायकाची पूजा म्हणजे ब्रम्हांडात भरून राहिलेल्या परमात्म तत्वाची पूजा. यालाच समर्थ "वैकुंठ राजा" म्हणतात. वैकुंठाचा राजा असलेल्या विष्णूची किंवा अवतारी देव असलेल्या रामाची/ कृष्णाची पूजा म्हणजेच सगुण देवाची पूजा. या सगुणदेवाच्या पूजेमुळे आपल्या अंतरीचा अंतरात्मा जागा होतो आणि सर्व विश्वात भरून राहिलेला वैकुंठराजा कळू लागतो. हाच ज्ञानदेवांनी सांगितलेला चराचरातील हरी..! (हरी दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ) अशा वैकुंठ राजाची मानसपूजा कशी करायची, ते समर्थांनी या लघु काव्यातून सांगितले आहे.समर्थांच्या या मानस पूजेतील १३ समासांमधून प्रत्येकी ११ ओव्या आहेत. हे तेरा समास पुढील प्रमाणे आहेत. १)स्थळ २)पारपत्य ३) स्वयंपाकिणी ४)सामग्री ५) पात्रे ६)फलाहार ७) स्वयंपाक ८) देवार्चन ९)वाढणे १०)भोजन ११) समारंभ १२) सायंकाळ पूजा आणि १३)विसर्जन.

एकूण १४५ ओव्यांचा अंतर्भाव या मानसपूजेमध्ये आहे. मठाच्या पारपत्य अधिकाऱ्यांसाठी केलेला उपदेश यात आहे. त्याबरोबरच ब्राह्मण पूजा, पाण्याची व्यवस्था, नियोजन व साठवण... वैभवशाली राज्य कर्ता, संयोजक व्यवस्थापक यांची निस्पृहता... स्वयंपाक, स्वयंपाकाची भांडी सामुग्री... मनाची शुद्धता... आरतीची वाद्ये... अशा अनेक गोष्टींचे वर्णन समर्थांनी या मानसपूजेमध्ये केले आहे. या सर्व वर्णनातून त्यांचे अचूक निरीक्षण कौशल्य आणि संगीताचे ज्ञान तर दिसतेच; शिवाय त्यांच्यामधला उत्तम प्रशासक व व्यवस्थापक ही दिसतो. त्याचबरोबर दक्षता ,महत्वकांक्षा, शिस्त अशा त्यांच्या ठायी असलेल्या अनेक गुण वैशिष्ट्यांचा आपल्याला परिचय होतो. एकेका समासातून क्रमशः ही मानसपूजा आपण समजावून घेऊ.

जय जय रघुवीर समर्थ