जेथून निर्माण विद्या|तेथें विद्या ना अविद्या|ऐक्यरूपे तया आद्या|नमन भावें||१||
जे निराकारी जन्मली|इच्छा कुमारी येकली|जन्ममूळा प्रसवली|उभय भागीं||२||
जेथें अंग पंग हेत|ते माय नस्तां निवांत|तया निवांताचा प्रांत|सद्गुरू स्वामी||३||
तयासी सर्वांगें नमन|तैसेचि संतसज्जन|आतां आठऊं ध्यान|तया सर्वोत्तमाचें||४||
असंगासी जडे संग|आकाशी उमटे तरंग|तरी च अभंगासी भंग|वर्णूं शके ||५||
परी अघटित चि साक्षपें|घडे स्वामीचेनि प्रतापें|जैसा अयोध्येच्या नृपें|सिंधू पालाणिला||६||
तैसी सद्गुरूकृपावोल|तेथे मुकेपणाचे बोल|खुणें बुझतां सखोल| अर्थ लाभे||७||
तया लाभाचेनि गुणें|परी ब्रह्मांड ठेंगणें|सद्गुरूकृपास्फुराणें|वाचा वदो लागे||८||
सहजस्थिती ते न मोडे|आणि जोडलें चि मागुते जोडे|न रिघता ठाईं पवाडे|निशब्दी शब्दु||९||
तये विदेशीचें रत्न|न जोडे केलिया प्रेत्न|ते श्रवणें जोडे यत्न|केला चि पाहिजे||१०||
जे पुरुष ना प्रकृती|जे मूर्ती ना अमूर्ती|जेथें श्रुति स्मृति | निवांत जाल्या ||११||
दृश्यकुळातें पाळित|म्हणौनि नामे कुळदैवत|दृश्य वेगळे सतंत |आपण असे||१२||
तो हा दाशरथी राम|सगुण निर्गुण पूर्णकाम|जयाच्या स्वरूपासी नेम|न चले सर्वथा||१३||
जैसे कर्पुराचे भंबाळ|नेमून सांगणे चि बाष्कळ|तैसी ज्ञातेपणाची चुळबुळ|आत्माराम वर्णितां||१४||
परंतु तयाचे कृपेस्तव|मीपणाचा पुसे ठाव|तरी वदोनि वगत्रत्व वाव|सहज चि आहे||१५||
बोलत असतां चि न बोलणें|हे खूण जयासी बाणे|ते चि श्रोते वक्ते शाहाणे| स्वहितविषईं ||१६||
आता वर्णीन रामराव|जो शंकराचा अंतर्भाव|तया स्वरूपाकडे धाव|घातली मनें||१७||
रत्नखचित द्वय पादुका|जेथून खुटती सर्व आशंका|जयापासून विवेका|पुढें रीघ नाहीं||१८||
पादुकांमध्ये विवेक बळ|करी असंभाव्य त़ुंबळ|जैसे उष्णामध्यें जळ|हेलावो लागे||१९||
तैसें द्वैत आहे जंवरी|विवेक नाना युक्ती करी|अपार तर्क नानापरी|आणून दावी||२०||
जैसें मीनाचें चाळकपण|जव ते जळ आहे संपूर्ण|जळ सोडितां आपण |मृत्य पावे||२१||
तैसी द्वैतापैलीकडे| विवेकाची हाव मोडे|मग मीनापरी मुरडे|अक्षोभ जळीं||२२||
पद प्रास जालियावरी|विवेकाची कैची उरी|निर्बुजोनिया माघारी|वृत्ती मुरडे||२३||
म्हणौनि निजपदीं विवेकासी|मार्ग फुटेनां जावयासी|मग पदपादुकासिधीसी|आनंद पावे||२४||
जेथें मीपण सांडिती|सज्जन पुढें पवाडती|जेथें जाणीव सांडुनियां श्रुती|गोप्य जाल्या||२५||
जेथे अत्यंत साकडी|जेथें मन संगती सोडी|तर्क जाणीव बापुडी|उभीच विरे ||२६||
वेळ दें जाणोनि मौन्य धरिलें|तें प्रतक्ष अनुभवा आले|अनुभवासी अनुभविलें|अनुभवेविण||२७||
दुर्गम मार्ग परम कठीण|सहसा न कळे भोयाळेंविण|स्वामीकृपेविरहित|कोण पावों शके||२८||
जेथे नांव रूप हें झडे|आनंद आनंदी बुडे|जेथे विशेष फुंज मोडे|निजसुखाचा||२९||
जेथे विषयसुख आटे|आनंद प्रगटोनि तुटे|जैसा कर्पूर दीपीं झगटे|उजळोनि मुरे||३०||
या पदां ऐलीकडिल गोष्टी|जेथे पडली विवेकदृष्टी|विवेकबळें तर्क वेष्टी|सीमा पादुकाची||३१||
रामनिजपदीं दृष्टी पडतां|मग कैंचा उरेल वर्णिता|जयास वर्णावें तत्वता|तो चि आपण||३२||
निवांत विश्रांतीचें स्थळ|उभाच विराला ब्रह्मगोळ|निर्मळ स्वरूप निखळ|कोंदाटले सदोदित||३३||
आवघे तें चि तें उदंड|वाटे बुझाले ब्रह्मांड|आधार तुटला निबीड|रामरूप प्रगटलें||३४||
वर्णितां रघुनाथचरण|अद्भूत गाजले निरूपण|वाटे परंतु परम हीण|निजपदीं न साहे||३५||
तया पदापासूनि साकार|सृष्टी जाली चराचर|तें चि ध्यान मनोहर|वर्णीन आतां||३६||
निजपद नाम ऐसें ठेविलें|तें चि साजिरीं दोनी पाउलें|जेथें मुनिजन रंगले|अनुभव पाहातां||३७||
मोक्षध्वज ऊर्धरेखा|ते चि सायोज्यमुक्ती देखा|वज्र अक्षै अंकुर सुखा| तो चि अंकुश शोभे|||३८||
निजसुखाची नव्हाळी|तें चि पदी पद्म झळाळी|जेथे दिव्य चक्षु न्याहाळी|दीपोनि ठेले||३९||
ज्ञानसूर्याची बाळप्रभा|ते चि टांचाची दिव्य शोभा|गुल्फ सुनिल तेणें नभा| निळिमा आली||४०||
पदीं पद चि मानुभाव|तया पदाचे पदपल्लव|साजिरे शोभती लाघव|जेथे युक्तीचें राहिलें||४१||
सून्यत्व नखाग्रें फेडिलीं|सजीव सतेजें उरलीं|पाहों जातां दिसे बिंबली|स्वरूपस्थिती||४२||
निजपदापासुनि उद्गारगंगा|निर्माण जाली भवतापभंगा|श्रवणस्नाने उत्धरी जगा|सज्जनसंगे||४३||
विशाळवोघ प्रगटला|तिहीं लोकीं विस्तारला|मुमुक्ष जनास उपेगा आला|ओंकार भगीरथ भाग्यें||४४||
तयें गंगेसी जे भावार्थी|मननयुक्त स्नानें करिती|ते सायोज्यता पावती| निजध्यासेंकरूनी||४५||
तये गंगेतीरी स्वानंदे|मिळालीं ब्रह्मनिष्ठ ब्रह्मवृंदें|स्नानें करिती अद्वैतबोधें|चुबकुलीया देती||४६||
अनंत जन्मांतरीचा मळ|क्रिया पालटे तात्काळ|ऐसें पवित्र गंगाजळ|कर्णद्वारें सेविती||४७||
ज्यास प्रत्यहीं स्नान घडे|त्यास कैवल्यपद जोडे|दिवसेंदिवस मूळ झडे|अभ्यांतरीचा||४८||
वासनावस्त्र मळीण जालें|प्रपंचसंगें स्नेह लागलें |ते अखंड जरी धूत गेलें|तरी शुद्धता पावें||४९||
ब्रह्मनिष्ठांचीं शुद्ध वस्त्रें|प्रत्यही प्रक्षाळिती धोत्रें|म्हणौनियां परम पवित्रें|सर्वकाळ असती||५०||
शब्दार्थ ----
१. पालाणिला - ओलांडला
२. रिघता - शिरणे, रहाणे
३. पवाडे - वाढणे, उत्पन्न होणे
४. रीघ - प्रवेश
५. तुंबळ - असंभाव्य, अफाट, प्रचंड
६. हाव - हव्यास
७. मुरडे - वळून पहाणे
८. अक्षोभ - शांत, स्थिर
९. पवाडती - स्तुती करणे
१०. गोप्य - गुप्त
११. भोयाळ - वाटाड्या
१२. फुंज - गर्व, अहंकार
१३. निजपद - ईश्वरचरण
१४. नव्हाळी - प्राप्ती
१५. गल्फ - पायाचा घोटा
१६. चुबकणे - बुडी मारणे
१७. पदांबुज - पाय
१८. पवाडे - कीर्ती, पराक्रम
१९. निजांगे - स्वतः
२०. तोडर - पायातील तोडा
२१. अंदू - पायातील अलंकार
२२. प्रबोधसिंह्य- ज्ञानसिंह
२३. भवगज - संसाररूपी हत्ती
२४. विदारणे - तोडणे
२५. सळे - गज, लोखंडी कांब
२६. लाहे - लाभ
२७. ज्वालमाळा - अग्निवर्णाच्या माळा
२८. पिसे - वेड
२९.दोर्दंड - बाहू, भूजा
३०. रजोगुणक्षेत्रीय - रजोगुणी क्षत्रिय
३१. मकरध्वज - मदन
३२. मुसावणे - तंतोतंत असणे
३३. दशन - दात
३४. सुरंग - अत्यंत निकट
३५. प्रवाळवल्ली - पोवळ्याची माळ
३६. क्लुप्त - शहाणा
३७.विढार - वसतिस्थान
३८. वितरागी - विरागी
३९. जोगी - लिंगायत साधू
४०. जंगम - योगी
४१. सोफी - सुफी संप्रदायातील मुस्लिम संत
४२. मृगमद - कस्तुरी
४३. चांचर - कुरळे
४४. कुरुळ - वक्र
४५. वीरगुंठी - केसांची गाठ
४६. किळा - तेज
४७. कुरवंडी - ओवाळून टाकणे
भावार्थ ---
भाग १ या काव्याच्या प्रारंभी श्रीसमर्थ ज्ञानमय शारदेला म्हणजेच मूळमायेला वंदन करतात. ही माया परब्रह्मामध्ये निर्माण झाली. याठिकाणी श्रीसमर्थ विश्वनिर्मितीविषयी भाष्य करत आहेत. सर्वत्र एकमेव परब्रह्म अस्तित्वात होते. ते निराकार होते, ज्ञानमय होते. त्यानुसार आकाशात हवेची झुळूक यावी, त्यानुसार शुद्ध स्फुरण निर्माण झाले. हे शुद्ध स्फुरण म्हणजेच मूळमाया. परब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे, त्यामुळे पोकळ असल्याचा भास होतो. म्हणून तेथे ना विद्या ना अविद्या ! म्हणजे निव्वळ पोकळी असल्याचा भास होतो. गणपती ज्ञानरुप आहे तर शारदा शक्तीस्वरूप आहे. विश्वामष्ये निर्मळ जाणीव जशी व्यापून आहे तशीच एक महाबलाढ्य शक्तीदेखील व्यापून आहे. दासबोधामध्ये शारदास्तवनात श्रीसमर्थ वर्णन करतात --- जे परमार्थाचे मूळ | नांतरी सद्विद्या केवळ | निवांत निर्मळ निश्चळ | स्वरूपस्थिती || ( दासबोध १.३.१६ ) हाच सद्गुरूंचा निवांताचा प्रांत ! म्हणजे विश्रांतीची विश्रांती ! असंगाशी जडे संग | आकाशी उमटे तरंग | तरी च अभंगासी भंग | वर्णू शके || पंचमहाभूते ही तमोगुणापासून निर्माण झाली. त्यातील सर्वात सूक्ष्म आकाश. आकाशाचा गुण "शब्द ". कोणतेही वर्णन करण्यासाठी शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. |हणजेच मायेच्या प्रांतातच गुणात्मक वर्णन करता येते. त्यामुळे मायेचा आधार घ्यावाच लागतो. परंतु हे सहजसोपे काम नाही. कारण -- मायेच्या बळे करी स्तवन | ऐसें वांच्छित होते मन | माया जाली लज्जायमान | काय करू || ( दासबोध १.४.५ ) असे सुंदर वर्णन दासबोधात आहे. परब्रह्माचे वर्णन करणे खरोखरच अवघड आहे. त्या अवघडपणाची कल्पना यावी म्हणून श्रीसमर्थांचे सद्गुरू प्रभुरांचंद्रांची असाध्य ते साध्य करून दाखविले त्या प्रसंगाची आठवण करून देतात. तो प्रसंग म्हणजे सेतूद्वारे समुद्रलंघन. परि अघटित चि साक्षपे | घडे स्वामीचेनि प्रतापे | जैसा अयोध्येच्या नृपे | सिंधू पालाणीला || ६ || या परब्रह्माचे वर्णन करण्यासाठी सद्गुरुकृपा हवीच. ती असेल तरच शब्दांच्या अर्थाच्या साम्राज्यात शिरून परब्रह्म शब्दबद्ध करता येते. यापुढे श्रीसमर्थ परब्रह्माबद्धल सांगण्यास सुरवात करतात. श्रीसमर्थांचे सद्गुरू श्रीप्रभुरामचंद्र. म्हणजेच सगुणरूपातील दाशरथी श्रीराम. तर आत्माराम म्हणजेच निर्गुण परब्रह्म. श्रीसमर्थ सगुण, म्हणून त्यांचे सद्गुरू सगुण. दासबोधात श्रीसमर्थ सद्गुरूंचे यथार्थ वर्णन करतात --- आता सद्गुरू वर्णवेना | जेथे माया स्पर्शो शकेना | ते स्वरूप मज अज्ञाना | काये कळे || ( दासबोध १.४.१ ) म्हणौनि सद्गुरू वर्णवेना | हे गे हेचि माझी वर्णना | अंतरस्थितिचिया खुणा | अंतरनिष्ठ जाणती || ( दासबोध १.४ ३१ ) सद्गुरू हे ब्रह्मस्वरूप आहेत. त्यामुळे निर्गुणस्वरूप सद्गुरूंचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. तरीपण आपले सद्गुरू म्हणचेच श्रीसमर्थ त्यांच्या सद्गुरूंचे म्हणचे प्रभुरामचंद्रांचे वर्णन करतात. अंतरस्थितीचिया खुणा | अंतरनिष्ठ जाणती || ( क्रमशः - भाग २) भाग २ सद्गुरू हे ब्रह्मस्वरूप आहेत. त्यामुळे निर्गुण स्वरूप सद्गुरूंचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. तरीपण आपले सद्गुरू म्हणजेच श्रीसमर्थ त्यांच्या सद्गुरूंचे, म्हणजे प्रभुरामचंद्रांचे वर्णन करतात, अंतरस्थितीचिया खुणा | अंतरनिष्ठ जाणती || श्रीसमर्थ हे वर्णन करताना सांगतात -- माझे सद्गुरू अत्यंत तेजस्वी आहेत. त्यानुसार कापूर तेजाने प्रज्वलित होतो, परंतु प्रज्वलित होताना त्या कापराची ज्वाळा फडफडते. त्यानुसार आत्मारामाचे वर्णन करताना बुद्धी सैरभैर होते, शब्दात अनुभव सांगणे अवघड होऊन जाते. तरीसुद्धा माझ्यावरील सद्गुरुकृपेमुळे मी वर्णन करत आहे. अधोमुखातून ऊर्ध्वदिशेकडे प्रवास म्हणून रत्नखचित पादुकांचे वर्णन करतात. दुसरी गोष्ट अशी की याठिकाणी दास्यभक्ती दिसून येते. सतशिष्याचे लक्ष सद्गुरुंच्या पायाकडे आहे. श्रीसमर्थ सांगतात माझ्या सद्गुरूंचे ध्यान साक्षात भगवान श्रीमहादेव करतात. आपला सगुणातील "श्रीराम" तर भगवान शंकरांचा निर्गुणातील "आत्माराम " ! तिन्ही लोक जाळू शके कोप येता| निवाला हरू तो मुखे नाम घेता | जये आदरे पार्वती विश्वमाता | म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता || ( मनाचे श्लोक ९४ ) असा नामाचा महिमा आणि भगवान श्रीशंकर यांचा संबंध मनोबोधात श्रीसमर्थ सांगतात व नामाचे महत्व प्रतिपादित करतात. पादुकांमधे विवेक बळ | करी असंभाव्य तुंबळ | जैसे उष्णामध्ये जळ | हेलवो लागे || १९ || सद्गुरुचरणी संपूर्ण शरणागती महत्वाची. ती झाल्याशिवाय विवेक जागा होत नाही. विवेक जागा झाला की प्रगती होण्यास सुरुवात होते. भक्ताचा अंतर्भाव आत्मनात्मविवेकाने भरून जातो. जोपर्यंत अनात्म म्हणजेच द्वैत शिल्लक आहे तोपर्यंत मनात अनेक शंकाकुशंका, तर्क जागृत होतात. हा अज्ञानी जीव या भवसागरातच जगत असतो, त्या भवसागरात अडकतो. तैसे द्वैत आहे जवरी | विवेक नाना युक्ती करी | अपार तर्क नानापरी | आणून दावी || २० || श्रीसमर्थ या ठिकाणी " विवेक " हा शब्द बुद्धी या अर्थाने वापरत आहेत. जोपर्यंत द्वैत आहे तो पर्यंत बुद्धी कार्यरत असते. त्या बुद्धी आधारे नाना तर्क करते. कुठपर्यंत असे वर्णन करते याचे उत्तर २१ व्या ओवीत दिले आहे. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत मासा जिवंत रहातो. पाणी नसेल तर मृत्यू पावतो. त्यानुसार जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत बुद्धीचे कार्य चालते. तेथपर्यंतच बुद्धीला मर्यादा आहेत. एकदा का द्वैताचा प्रांत ओलांडला की बुद्धीचे कार्य थांबते. ज्यानुसार मासा पाण्यात वळून पुन्हा विरुद्ध दिशेला जातो त्यानुसार अद्वैताचा प्रांत सुरू झाल्यावर बुद्धी आपोआप वळून आपल्या मार्गाने प्रवास सुरु करते आणि मग मनच अद्वैत होऊन गेल्यामुळे शांत होते. बुद्धीचे चंचळत्व विरून जाते. मग वृत्तीसुद्धा माघारी फिरतात. मीपण नाहीसे होते. सज्जनांना आत्मानंद प्राप्ती होते. या अवस्थेत श्रुतीसुद्धा नाहीशा होतात, मन "न"मन होते. त्यामुळे तर्क हतबल होऊन विरून जातात. वेदसुद्धा या अद्वैताचे वर्णन करू शकत नाहीत. आत्मज्ञान ही सांगण्याची, वर्णन करण्याची, शब्दबद्ध करण्याची गोष्ट नसून अनुभव घेण्याची गोष्ट आहे. ( क्रमशः भाग ३)