🚩|| श्री समर्थांचे लघुकाव्य निर्गुणध्यान ||🚩
श्रीसमर्थांचे उपास्यदैवत तसेच सद्गुरू प्रभुरामचंद्र. निर्गुणध्यान या लघुकाव्यात श्रीसमर्थ आपले सद्गुरू, सगुणरूपातील श्रीप्रभुरामचंद्र यांचे निर्गुणरूप म्हणजेच आत्मारामाच्या अनुभूतीचे वर्णन या काव्यात करतात. संपूर्ण विश्वाला परब्रह्म व्यापून आहे तरी सुद्धा ते शिल्लक रहाते. ते किती शिल्लक रहाते हे आजपर्यंत कोणीच सांगू शकले नाही. ते स्वरूप कल्पनातीत आहे, अनंत आहे. हे परब्रह्मस्वरूप म्हणजे संतांचा सद्गुरू होय. सद्गुरू म्हणजे कोणी व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. ते दाखवता येत नाही परंतु अनुभवता येते. ते अनुभवायचे असेल तर सगुणाचा आधार, एक आलंबन म्हणून घ्यावा लागतो. घ्यावा लागतो. श्रीसमर्थ भक्तिमार्ग सांगतात आणि या भक्तिमार्गाचा प्रवास हा सगुणाच्या आधारानेच होतो. श्रीसमर्थ दासबोधात सांगतात -- सगुणाचेनी आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे । सारासार विचार । संतसंगे ।। सगुणाचा आधार आणि संतांची वचने याचा आधार घेत साधक आपली वाटचाल करत असतो. एकाक्षणी ती साधना फलद्रुप होते आणि त्या साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. तो झालेला अत्यानंद, ते समाधान त्या साधकाला कोणालातरी सांगावेसे वाटते. आत्मस्वरूपाची अनुभूती ही भक्तांच्या आयुष्यातील पर्वणीच असते. जीवन कृतकृत्य झाले याचे समाधान असते. आता काहीच मिळवायचे शिल्लक रहात नाही. हे प्राप्त झालेले ऐश्वर्य घेऊन हा भक्त पुढील वाटचाल मोठ्या समाधानात जगतो. ही प्राप्ती त्या भक्ताला सद्गुरूंमुळे झाली आहे याची जाणीव त्याला आहे. स्वर्गलोक इंद्र संपत्ती । हे काळांतरी विटंबती । सद्गुरुकृपेची प्राप्ती । काळांतरी चळेना ।। ( दासबोध १.४.२८) अशी कधीही न क्षय पावणारी प्राप्ती भक्ताला झाली आहे. मग त्याच्या मनाची धारणा काय आहे, कशी आहे याचे सुरेख वर्णन म्हणजे हे लघुकाव्य. प्रस्तुत लघुकाव्य वाचताना एक गोष्ट लक्षात येते की ईश्वर भक्तासाठी, भक्ताला आवडते, भक्ताला वाटते त्यानुसार, भक्ताला हवे त्यानुसार, भक्ताच्या कल्पनेनुसार भक्तासाठी सगुणरूप धारण करतो. दुसरे असे की सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास सहजसाध्य नाही. त्यासाठी षड्रिपू तसेच त्रिगुण यांवर मात करणे महत्वाचे आहे, यांची बेडी तोडणे महत्वाचे ! यासाठी सद्गुरू शरणागती हा एकमेव उपाय आहे. असे हे सुंदर "निर्गुणध्यान " याची प्राप्ती सर्वांना होवो हीच श्रीसमर्थ चरणी प्रार्थना !