गणेश शारदा सद्गुरु |संतसज्जन कुळेश्वरु |माझा सर्वही रघुवीरु |सद्गुरुरूपें ||१||
माझें आराध्यदैवत |परमगुह्य गुह्यातीत |गुह्यपणाची ही मात |न चले जेथे ||२||

जें स्पर्शलें नाहीं वेदवाणी |जें वर्णवेना सहस्रफणी |जेथें अनुभवाची कडसणी |आटोनि गेली ||३||
जें शब्दासी अगोचर |जें निःशब्दाचें निजबीज |जें शंकराचें निजगूज |समाधिशोभा ||४||

जो वेदांचा अंतरभाव |सायुज्यमुक्तीचा ठाव |जेथें भावनेचा अभाव |भावेंसहित ||५||
शब्द जो बाहेर पडे |तें त्या शब्दापैलिकडे |म्हणोनि अनुभवितां मोडे |हाव मनाची ||६||

असें तेंचि आदिअंत |माझें आराध्यदैवत |जेथें सर्व मनोरथ |पूर्ण होती ||७||
जें साराचें निजसार |जें आनंदाचें भांडार |जें मोक्षाचें बिढार |जन्मभूमी ||८||

जें निर्विकल्पतरूचें फळ |अनुभवें पिकलें रसाळ |तया रसाचें गळाळ |घेती स्वानुभवी ||९||
जालिया रसाचे विभागी |अमरत्व जडे अंगीं |संगातीत महायोगी |होइजे स्वयें ||१०||

ऐसा जो कां परमपुरुष |निर्विकल्प निराभास |शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश |आत्माराम ||११||
ऐशा जी सद्गुरुरामा |अगाध तुमचा महिमा |ऐक्यरूपा अंतर्यामा |मूळपुरुषा ||१२||

तुझिये कृपेचेनि उजियेडें |तुटे संसारसांकडें |दृश्य मायेचें मढें |भस्मोनि जाय ||१३||
तुमचे कृपेचा प्रकाश |करी अज्ञानाचा नाश |भाविक भोगिती सावकाश |अक्षयपद ||१४||

क्षयचि नाहीं कल्पांतीं |एक स्वयें आदिअंतीं |ऐसे सुख कृपामूर्ती |प्रकट कीजोजी ||१५||
जेसाधनाचें निजसाध्य |निगमागम प्रतिपाद्य |योगेश्वरांचें सद्य |विश्रांतिस्थळ ||१६||

जें सकळ श्रमाचें सार्थक |जें भाविकां मोक्षदायक |तुमच्या हृदयीं अलोलिक |परम गुह्य ||१७||
जें महावस्तूचें साधन |जें अद्वैतबोधाचें अंजन |जेणें पावती समाधान |महायोगी ||१८||

जेथें दुःखाचा दुष्काळ |आणि आनंदसुखाचा सुकाळ |जें निर्मळ आणि निश्चळ |तेंचि तें अवघे ||१९||
ऐसें जें महा अगाध |योगेश्वरांचा निजबोध |आत्मज्ञान परम शुद्ध |पाषांडावेगळें ||२०||

नाना मतें मतांतरें |सृष्टींत चाललीं अपारें |तयामध्यें ज्ञान खरें |वेदांतमतें ||२१||
जें शास्त्रबाह्य घडलें |संतामहंतासी बिघडलें |तें ज्ञानचि परी पडिलें |पाषांडमतीं ||२२||

असो सर्व प्रकारें शुद्ध |जें सर्वांमध्यें प्रसिद्ध |तया ज्ञानाचा प्रबोध |मज दीनासी करावा ||२३||
दुस्तर भरला भवसागरू |स्वामी बुडतयाचें तारूं |मज दीनासी पैलपारू |पाववाजी ||२४||

ऐशी नाना करुणावचनें |बोलता जाला म्लानवदनें |ऐकोनि स्वामी आश्वासनें |बुझाविते जालें ||२५||
आतां प्राप्तीचा समयो |होईल अज्ञानाचा लयो |मोक्षसाधनाचा जयो |होय श्रवणें ||२६||

पुढील समासीं पूर्ण |ऐसें आहे निरूपण |श्रोतीं करावें श्रवण |सावध होवोनी ||२७||

शब्दार्थ ----

१. समधीशोभा - समाधीचे भूषण
२. बिढार - वस्ती, बिऱ्हाड
३. गळाळ - रस
४. निगमागम - निगम + आगम
निगम - वेद, आगम - तंत्रशास्त्र, शाक्तपंथीय विद्या
१. समधीशोभा - समाधीचे भूषण
२. बिढार - वस्ती, बिऱ्हाड
३. गळाळ - रस
४. निगमागम - निगम + आगम
निगम - वेद, आगम - तंत्रशास्त्र, शाक्तपंथीय विद्या

भावार्थ ---


पंचसमासीच्या पहिल्या समासात २७ ओव्या आहेत. अध्यात्म ग्रंथलेखन प्रथेप्रमाणे या पहिल्या समासात श्रीसमर्थांनी शिष्याच्या मुखाने आधी गणेश शारदा सद्गुरु त्यांच्या कुळाचा ईश्वर श्रीसमर्थांचे आराध्यदैवत असे सर्व काही असलेल्या सद्गुरुरूप रघुवीर प्रभू श्रीरामास वंदन करुन पुढे अनेक गुणविशेषणांनी संबोधत सद्गुरुरामाचा महिमा वर्णन केला आहे. जणू हे सद्गुरुस्तोत्र आहे असे वाटते. सद्गुरुकृपेने संसारबंधन तुटून दृश्य मायेचे मढे भस्म होऊन अज्ञानाचा नाश होऊन ज्याला कल्पांती ही क्षय नाही अशा त्या एक स्वये आदिअंती अक्षयपदाचा लाभ जे भाविक भोगतात असे ते सुख कृपामूर्ती सद्गुरुंनी प्रगट करुन दाखवावे ही विनंती शिष्याने केली आहे. पुढे साधानांचे निजसाध्य, निगमागमप्रतिपाद्य, योगेश्वरचे विश्रांतीस्थळ, महावस्तूचे साधन, अद्वैतबोधाचे अंजन. निर्मळ निश्चल, महा अगाध इत्यादि अनेक विशेषणांनी परम शुद्ध आत्मज्ञान गुणमहिमा वर्णन केले आहे. महावस्तू या शब्दाने परब्रह्म याचा निर्देश केला आहे. सद्गुरू जवळ महावस्तू म्हणजे अक्षय पद प्राप्त करण्याचा साधनामार्ग आहे. त्यासाठी ज्ञानमय चिन्मय अद्वैतबोधाचे अंजन डोळ्यात घातल्यावर महावाक्यांचा बोध होऊन त्रिगुणात्मक जगाचा विसर पडून प्रपंचभाव नाहीसा होतो. अष्टधा प्रकृतीची अवस्था महावाक्याच्या बोधात संपून या अनुभूतीने निर्गुण निराकार शुद्ध ब्रह्म तत्व समजते. देशकाल वस्तुभेद, द्वैत आणि अद्वैत हाही भेद नाहीसा होऊन आत्मा निर्मळ होऊन त्याला मूळ विश्वाकार स्वरुपाची जाण होते. प्रपंच हा प्रपंच न राहता तो परमब्रह्मरूप होतो. अहं – सोहं ची उमज येऊन “ तत्वमसि ”, “ अहं ब्रह्मास्मि ’’ या महावाक्याचा बोध होतो असे म्हंटले आहे. या महावाक्याचा बोध होऊन समाधान प्राप्त होऊन जे अक्षयपद प्राप्त होते तिथले वर्णन शिष्याने केले आहे. जीव व शिव, चित्त व चैतन्य यांचे ऐक्य होऊन जीव व शिव एका मुशीत घातल्याप्रमाणे एकरूप होऊन मुळच्या अद्वैत स्थितीला येतात. त्याचे वेगळे अस्तित्व उरत नाही. तसे भक्ताचे होते. भगवंत धाम, अक्षयपद हे असे उच्च स्थान आहे की जेथे बसून भक्त निश्चल व निश्चिंत होतो. द्वैत अद्वैत संपल्याने, मन तृप्त समाधानी झाल्याने अंतरीची तळमळ संपल्याने, परब्रह्म भेटीने सुखाचा, आनंदाचा सुकाळच सुकाळ तिथे होतो. दु:खाचा लवलेशही तिथे नसल्याने दु:खाचा दुष्काळ तिथे पहावयास मिळतो. निर्मळ, निश्चळ, स्थिर, अक्षय अशा पदाची प्राप्ती साधकास सद्गुरुमुळे होते. शिष्य याला ‘ तेचि ते अवघे” म्हणजे एकमेव अद्वितीय असे संबोधत आहे. “ ऐसे जे ” असे म्हणण्याचा हेतू हा की या समासात जे परम शुद्ध ज्ञानाचे, अक्षयपदाचे, आत्मज्ञानाचे, योगेश्वराचे वर्णन आले आहे ते सर्व. हे ज्ञान महान ,गहन, गूढ अनाकलनीय असून मिळण्यास कठीण आहे. पण सद्गुरुमुळे हे महान ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच सर्व नियामक ईश्वराशी भक्ताची सांगड होऊन योगेश्वराशी योग जुळून येतो. निर्गुण निराकार परमब्रह्माची गाठ पडते. असे हे सर्व शाब्दिक ज्ञान शिष्याला समजले. पण “ ऐसे जे ” निर्मळ, निश्चल, महा अगाध, परम शुद्ध, आत्मज्ञान ज्याने योगेश्वरांचा निजबोध प्राप्त होइल, शिष्याला ते प्राप्त करायचे आहे. पण कसे प्राप्त करायचे आहे ? तर ते शिष्याने या ओळीतील शेवटच्या एकाच शब्दात स्पष्टपणे सांगितले आहे, ते म्हणजे “ पाषांडावेगळे .” समर्थांनी शिष्याच्या तोंडून अत्यंत महत्वाचा असा “ पाषांडावेगळे ” हा शब्द इथे घेत या समासात पाषांडाचा धिक्कार केला आहे. कारण पाषांड हे दिसण्यात अगदी ज्ञानासारखेच दिसत असल्यामुळे बऱ्यांच साधकांची या पाषांडाला भुलून फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यासाधकांचे श्रम वेळ तर वाया जातातच. शिवाय इतर साधकांचा अध्यात्मावरील विश्वास जाण्याचा संभव असतो. म्हणूनच समर्थांनी या समासात स्पष्ट शब्दात पाषांडाची व्याख्या दिली आहे. वेदांचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक त्यांना समजले त्याप्रमाणे आपली मते मांडतात. स्वर्गप्राप्ती बद्दल अनेकांची अनेक मते आहेत वेदांतील आणि शास्त्रातील वर्णन ऐकून स्वर्गादी लोकांची आस्था ठेवणारे साधक स्वर्गात उत्तमोत्तम दिव्य भोग मिळतात म्हणून, स्वर्गालाच श्रेष्ठ मानून, त्याच्या प्राप्तीसाठीच रात्रंदिवस प्रयत्न करतात. म्हणूनच समर्थांनी या ओवीत “पाषांडा ” वरील आपले मत अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे शिष्याच्या तोंडून मांडले आहे. समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे थोतांड नव्हे. कांही लोकांच्या अज्ञानामुळे समर्थांच्या काळी भक्तिमार्गात अनेक बंडे उद्भवली होती त्यांच्यावर कोरडे ओढत या पंचसमासीतील पहिल्या समासात या पाषांडाचा धिक्कार करत समर्थांनी पाषांडाची व्याख्याच दिली आहे. जे शास्त्रबाह्य घडले | संतामहंतासी बिघडले | ते ज्ञानचि परी पडिले | पाषांडमती || समर्थांच्या काळची ही स्थिती पाहून, या विवेकी शिष्याने इथे समर्थांना ,त्याला नेमके काय हवे आहे ते स्पष्ट शब्दात सांगत, सर्व प्रकारे शुद्ध आणि सर्वात प्रसिद्ध अशा ज्ञानाचा प्रबोध सद्गुरुनी करावा अशी अत्यंत कळकळीची विनंती ‘ मज दीनासी करावा | ” असे म्हणत शरणांगती पत्करली आहे. मायेच्या प्रभावाने जीव परब्रह्म परमात्म्याला विसरला म्हणून समर्थांचा हा पूर्ण विवेकी शिष्य भगवंत प्राप्तीचा मार्ग विचारताना “ दुस्तर भरला भवसागरू | स्वामी बुडतयाचे तारुं | मज दीनासी पैलपारू | पाववाजी || (पं. १.२४ ) असे म्हणतो. भवसागराचे पैलतीर म्हणजेच अक्षयपदप्राप्ती हवी म्हणून सद्गुरूस पूर्णत: शरण जाऊन ज्ञानाचा बोध देण्याची विनंती शिष्याने सद्गुरूस या समासात केली आणि समर्थांनी सुद्धा “ अज्ञानाचा लय होऊन मोक्षसाधनेचा जय होईल असे ज्ञान तें शिष्याला सांगतील असे आश्वासन दिले..