🚩|| श्री समर्थांचे लघुकाव्य पंचसमासी ||🚩
श्रीसमर्थांचे ग्रंथसाहित्य संपदा अफाट आहे. त्या प्रत्येक साहित्यातून श्रीसमर्थांनी भाग्याने माणूस जन्म मिळाल्याचे सांगत त्याचे सार्थक करावे यासाठी बोध दिला आहे. या बोधपर साहित्यातून मार्गदर्शन करताना श्रीसमर्थांनी एकूण ११ लघुकाव्ये लिहिली असून बहुतेक प्रकरणे सद्गुरु सत्शिष्य यांच्या संवादरुपात आहेत. विशेष म्हणजे शिष्याला नुसतेच समोर बसवून बोध दिला असे नाही तर कांही ठिकाणी मांडीवर बसवून, कांही ठिकाणी हृदयाशी घेऊन, काही ठिकाणी शिष्याला बाळा बापा प्राणसखया असे संबोधत मातृभावनेने, जवळीक साधत लडिवाळपणाने जवळ घेऊन दिलेला बोध आहे. या मायेमुळे वाचकाच्या मनात ही हे आध्यात्मिक काव्य वाचताना ताण उरत नाही. आकलनास सहज सोपे होते.
तसेच साधनामार्ग पुन्हा पुन्हा सविस्तर सांगताना श्रीरामनाममहिमा पुन्हापुन्हा वर्णन केल्यामुळे ते रामनाम अंतरंगात दृढ होते. सद्गुरु भेटीची ओढ जीवाला लागते. आणि सद्गुरुने दिलेल्या नाममंत्राची गोडी वाढत जाऊन जीवशिव यांचे ऐक्य घडते. ईश्वरदर्शन स्वरुपदर्शन घडते. सद्गुरु भेटीने जीवनाचे सार्थक होते. या काव्याची भाषा मायेची प्रेमाची जिव्हाळ्याची असल्यामुळे थेट हृदयाला भिडते. श्रीसमर्थांचे शब्द सामर्थ्य इतके विलक्षण आहे की यातील ओव्या मंत्रमुग्ध करतात. वाचताना वाचक तन्मय होऊन देहभान विसरुन, सर्व सुखदु:ख ताण तणाव, कामाचा शीण असे जगाचे भान विसरुन या काव्यात समरस होऊन जातो. विशेष म्हणजे श्रीसमर्थांनी साध्या सोप्या भाषेत आपला सर्व जीव ओतून अत्यंत प्रेमाने संपूर्ण हृदय मोकळे करीत एक अवघड क्लिष्ट गूढ गुह्य वाटणारा विषय समजण्यास सोपा केल्यामुळे वाचताना मनाला कंटाळा येत नाही उलट पुढे वाचण्याची उत्सुकता वाढत जाते. हे या लघुकाव्याचे फार मोठे यश आहे.
कोणतेही लघुकाव्य वाचावे आणि थोडक्यात सर्व ग्रंथाचे सार प्राप्त करावे असा कमी शब्दात जास्तीत जास्त बोध यातून दिला आहे. त्यापैकीच पंचसमासी हे एक लघुकाव्य नावाप्रमाणे पाच समासाचे आहे. सद्गुरु आणि सत्शिष्य यांच्या प्रश्न आणि उत्तराने, आपल्याला प्राप्त होणाऱ्या बोधाने या लघुकाव्यात विलक्षण गोडी निर्माण झाली आहे. या लघुकाव्यातून श्रीसमर्थांनी साधनेवर विशेष भर दिला आहे. श्रीसमर्थांनी नेहमीच आधी प्रपंच नेटका करावा पण नंतर परमार्थ ही साधावा हे सांगितले आहे. असेच या पंचसमासात सुद्धा श्रीसमर्थ म्हणतात चालवीत असता आश्रम | जे होईजे आत्माराम | ऐसा हा सत्समागम | महिमा कोटिगुणे || ( पंच.५|३०) असे म्हणत बोध दिला आहे.