आता वंदीन कुळदैवत| लीळाविग्रही भगवंत | जो संकटीं सांभाळीत | आहे निजदासां || १ ||
येकवचनी येकबाण| एक पत्नी अभंग ठाण| अजिंक्य राक्षसां निर्वाण | कर्त्ता समर्थ येकु || २ ||

जो धार्मिक पुण्यपरायण| शांति लावण्य सुलक्षण |जेणें त्रिंबक परम कठीण| भग्न केलें बळें || ३||
जो लावण्याचा जनक| जो सौंदर्याचा नायक| जो मार्तंडकुळदीपक | चातुर्यनिधी ||४||

ऐसा राम राजीव नयन| साधुजनांचें भुवन |तया प्रभूचें ध्यान| वर्णीन हळुहळु || ५||
टवटवीत आणि रसाळ | निमासुर वदन वेल्हाळ| लावण्य साजिरें केवळ | आनंदाचें वोतलें || ६ ||

सुरेख भृल्लता वेंकट| सरळ सतेज नासापुट| नीट नेपाळलें लल्लाट l तेथें त्रिवळी साजिरी || ७ ||
केशर ऊर्धपुंड्र लल्लाटीं| वरी कस्तुरिका दुबोटी| सुरंग अक्षता त्रिपुटी| शोभायमान || ८ ||

रत्नजडीत मनोहरें| कुंडलें तळपती मकराकारें |श्रवण कोमळ तेणें भारे| लंबीत जाले || ९||
सुरंग लावण्य विचित्र| कोमळ तिक्षण पद्मपत्र | तैसें आकर्ण विशाळ नेत्र | अधोन्मिळीत साजिरे || १० ||

अनर्ध्य रत्ने शुद्ध हेमी| खचित मुगुटीं फाकती रश्मी| जैसा माघव वरूषतां व्योमी| प्रगटे विद्युल्यता || ११ ||
तैसीच कीरटी तेजाळ| पीत आरक्त फाकती कीळ | विलेपनें साहित्य भाळ| प्रकाशलें तेणें || १२ ||

अभ्यंग केला चंपक तैलें| चाचर कुरळीं गुंफिली फुलें| तेणें परिमळें लोधलें| मानस मधुकरांचें || १३||
तया कुसुमाचेनि वेधे| रुंझी करिताती षट्पदें| अंतराळी झुंकार शब्दें| प्रीतीनें पांगुळती || १४ ||

दिव्यांबराचा चोपूनि पट्टा| मस्तकी वेष्टिला लपेटा|वरी नक्षेत्रां ऐसा गोमटा| घोस मुक्तफळांचा || १५ ||
नाना सुमनाचिया माळा| मुगुटा वेष्टित घातला पाळा|विविध परिमळें आगळा| नेतसे सुवायु || १६ ||

सर्वकाळ आनंदवदन | मंदहास्ये झमकती दशन |कृपादृष्टी अवलोकन | करिती निजदासां || १७||
प्रवाळ वल्ली परम कठीण| सुरंगचि परि पाषण | कोमळ अधरी दृष्टांत हीण | बोलों चि नये || १८ ||

कोटी मदन मयंक| उपमे नये श्रीमुख |पूर्णत्वाचे पूर्ण बीक | लावण्यशोभा मुखश्री || १९||
चुबुक साजिरी हनुवटी| मुक्तमाळा डोलती कंठीं| मर्डीव दोर्दंड बाहुवटी| रत्नकीळा फाकती || २० ||

शोभे विशाळ वक्षस्थळ | उदरीं त्रिवळी सरळ | तेथे नाभी जन्ममूळ | चतुराननाचें || २१ ||
रत्नखचित पदक गळां| शोभती पुष्पांचिया माळा| कट्टप्रदेशीं मेखळा| जघन सानु सींह्याकृत || २२ ||

पीतांबरू मालगंठी| कास कासिली गोमटी| क्षुद्र घंटांची दाटी| गर्जती झणत्कारें || २३ ||
नाना सुगंध परिमळ | सर्वांगी उटी पातळ | रुळे वैजयंती माळ | आपादपरियंत || २४ ||

करपलवीं रत्नभूषणें| आजानबाहु वीरकंकणें| कीर्तिमुखें सुलक्षणं| केयूरें दंडीं || २५||
आपाद रुळे पीतांबरु| न कळे जानजंघाचा विचारु| चरणीं ब्रीदांचा तोडरु | दैत्यपुतळे रुळती || २६ ||

गुल्फ वर्तुळ घोटि निळीं| मुर्डिव वांकि खळाळी |अंदु लिगटे झळाळी| प्रभा तेथीची || २७||
पातळ पाउलें कोमले| पदपल्लवीं दशांगुळें | नखतेजें चि उजळलें | ब्रह्मांड नेणों || २८ ||

कि उगवलीयां चंद्ररेखा | तैसीं नखाग्रें देखा| सुरंग वर्तुळ टांका| आरणोदया सारिख्या || २९ ||
तलवे सुरंग सतेज| उर्धरखा आणि ध्वज | वज्र अंकुश तेजपुंज| पद्म झळाळी || ३० ||

ज्ञानमुद्रा सव्य हस्ती | पाउल मांडीवरी येक क्षिती| तेथे पावली उत्तम गती| अहिल्यासीळा || ३१ ||
ऐसी सर्वांगे सुंदर| सावळी मूर्ती मनोहर | राजवेश अति सकुमार| शोभे सींहासनीं || ३२ ||

परिमळ धुशर उधळलें| तेणे श्रीमुख रजवटलें | सतेज किरटीचें जालें| किंचित तेज मंद || ३३ ||
सकळ वनितांचे मंडण | परम लावण्य सुलक्षण | जानकी अवनीगर्भरत्न | विश्वमाता || ३४ ||

ते जानकी जनकतनया | वामांगी शोभे मूळमाया| दशणें निकट सुबाह्या| उभा असे लक्षमणु || ३५||
भरत शत्रुघ्न लावण्यखाणी| तैसाचि शोभे गदापाणी | हास्यमुखें सुलळीत वाणी| बोलती परस्परें || ३६ ||

पीतयापरीस अधिक गती| जयावरी रघुनाथाची प्रीती| पुढे सन्मुख मारुती| उभा असे कर जोडुनी || ३७||
भगवद्दासांचें मंडण | कपिकुळाचें भूषण| सकळ वान्नरांचे प्राण | रक्षिले जेणें || ३८ ||

परम प्रतापें आगळा | दिसे जैसा पर्वत नीळा| सिंधु उडोनी अवलीळा | जानकी शोधिली बळें || ३९ ||
स्वयंभ सुवर्णाची कासोटी| उभा उद्दित जगजेठी| अति आदरें सन्मुख दृष्टी| रघुनाथपादांबुजीं || ४० ||

शब्दार्थ ----

त्रिंबक - शिवधनुष्य
निमासुर - सुंदर
भ्रूलता - भुवई
त्रिवळी - तीन वळ्या
सुरंग - सुडौल
मकराकारे - माशाच्या आकाराचे
अनर्घ्य - बहुमोल
रश्मी - प्रकाश किरण
कीळ - तेज
शटपदे - भुंगा
प्रवाळ - एक रत्न
मयंक - चंद्र
बीक - तेज, सौंदर्य
चुबुक - रेखीव
मुक्तमाळ - मोत्याची माळ
दोर्दंड - दंड
बाहुवटी - हात।
रत्नकीळ - रत्नांचे तेज
चतुरानन - ब्रह्मदेव
केयुरे - अलंकार
गुल्फ - पायाचा घोटा
अंदू - पायातील अलंकार
क्षिती - पृथ्वी
रजवटले - माखले
उद्दीत - उद्दिष्ट
जगजेठी - परमेश्वर
शेषपात्रे - एक भांडे
देवढी - गर्दी
विछणे - कंठा
वेत्र - काठी
पुंजाळ - तेजाचा लोळ
मुक्ताफळ - मोती
पोटाळे - फुगलेले
अमरावती - देवांची राजधानी
सुरवर - देवश्रेष्ठ
पाळा - गराडा
सनाकदिक - एक ऋषी
तुंबर - स्वर्गातील गायक
लंबायमान - लांब
मुंडपघसणी - गर्दी

भावार्थ ---


या लघुकाव्याच्या ओवी १ ते ४० मध्ये श्रीप्रभुरामचंद्रांचे सगुण वर्णन श्रीसमर्थ करतात. श्रीप्रभूरामचंद्र हे सद्गुरू तसेच उपास्य दैवतसुद्धा ! त्यामुळे अशा देवतेचे वर्णन करताना श्रीसमर्थ हरखून जातात. श्रीसमर्थ सांगतात श्रीरघुनाथ माझे कुलदैवत आहे. जो त्याला शरण जाईल त्याला श्रीराम नक्की सांभाळतो. माझा राम, माझे सद्गुरू कसे आहेत --- एकवचनी, एकपत्नी, अजिंक्य, राक्षसाचे निर्दालन करणारा, धार्मिक, पुण्यपरायण, लावण्यस्वरूप, शांत असा आहे. माझा राम सूर्याच्या वंशातील आहे. तो साधुजनांचा आधार आहे. प्रभुरामचंद्रांचे अतिशय रेखीव वर्णन श्रीसमर्थ करतात, ते वाचताना आपल्या डोळ्यासमोर प्रभुरामचंद्रच उभे रहातात. मनोबोधात " घनश्याम हा राम लावण्यरूपी । "अशी सुरवात असणारा श्लोक आहे. याचरणातील " हा " शब्द वाचतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की श्रीसमर्थ प्रभुरमचंद्रांना प्रत्यक्ष पाहत आहेत. अशीच जाणीव हे लघुकाव्य वाचताना येते. पुढे श्रीसमर्थ वर्णन करतात -- माझा राम दिसायला अत्यंत लाघवी आहे. त्याचे लावण्य शब्दातीत आहे. त्याचे वर्णन करायचे झाले तर -- अत्यंत रेखीव, धनुष्याकृती भुवया, तरतरीत नाक, भव्य कपाळ, त्यावर केशरी कस्तुरीमिश्रित उभे दुबोटी गंध, त्यावरती शुभ्र अक्षता लावलेल्या, बहुश्रुत असल्यामुळे मोठे कान आणि कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडले, डोळे टपोरे अर्धोन्मीलीत आहेत. पावले अत्यंत कोमल आहेत. श्रीरामाच्या सोनेरी मुगुटत अत्यंत बहुमोल रत्ने कोंदलेली आहेत. त्यामुळे त्या मुगुटची झळाळी काही औरच आहे, जणूकाही पाऊस कोसळताना मध्येच वीज चमकावी असा भास होतो. त्यानुसार मुगुटाच्या झळाळीमुळे तो प्रकाश श्रीरामाचे कपाळ उजळून टाकत आहे. प्रभुरामचंद्रांच्या गळ्यात सुगंधी फुलांचा हार आहे. त्या फुलांचा सुगंध सर्वत्र पसरला आहे. त्या सुवासामुळे भुंगे आजूबाजूस रुंजी घालत आहेत. तसेच गळ्यात मुक्ताफळांची माळ आहे. अ से हे प्रभुरामचंद्र सुहास्यवदन आहेत आणि ते आपल्या भक्तावर कृपा करतात. खरं तर त्यांच्या मुखाचे वर्णन शब्दातीत आहे. प्रभुरामचंद्राचा चेहरा तेजस्वी आणि पौर्णिमेच्या चंद्रानुसार गोल आहे. हनुवटी रेखीव आहे. बाहु पिळदार असून त्यांच्या दंडातील अलंकाराचे तेज आजूबाजूस पसरलेले आहे. छाती भव्य आहे. त्यामधून ब्रह्मदेव जन्मले अशी मोठी नाभी आहे. कमरेला मेखला आहे, सिंहाकृती मांड्या आहेत, त्यावर पितांबर नेसला आहे. त्याची काससुद्धा विलोभनीय आहे. त्या पितांबरावर छोट्या छोट्या घंटा आहेत, त्यांची किणकिण फारच श्रवणीय आहे. पायापर्यंत वैजयंती माळा परिधान केल्या आहेत. हातात दिव्य रत्नांचे अलंकार आहेत, तसेच वीरकंकण परिधान केले आहे. प्रभुरामचंद्रानी हे अलंकार धारण केल्यामुळे अलंकाराचे सौंदर्य आणि तेज वाढलेले आहे. श्रीरामाचे पायाचे घोटे रेखीव वर्तुळाकार आहेत. पायातील अलंकार चमकत आहेत. पावले अत्यंत कोमल आहेत. बोटे अत्यंत रेखीव आहेत. त्याची नखेसुद्धा उजळ आहेत. अरुणोदय होताना सर्वत्र गुलाबी प्रकाश पसरतो, त्या रंगानुसार नखे गुलाबी दिसत आहेत. हाताचे आणि पायाचे तळवे कोमल आहेत. त्यावर शुभचिन्हे, मुद्रा आहेत. त्यांच्या हाताची ज्ञानमुद्रा आहे की जी गर्तेत अडकलेल्या सर्व जगाचे कल्याण करते. असे सावळे, सुंदर, मनोहर प्रभुरामचंद्र आहेत. प्रभुरामचंद्र सिंहासनारूढ आहेत. त्यांच्या दरबारात सुवासिक बुक्क्याची उधळण केली असल्यामुळे त्यांचा चेहरा त्यामुळे काहीसा माखलेला आहे आणि त्यांच्या मुकुटाचे तेज काहीसे निस्तेज झाल्याचा भास होत आहे. आता श्रीसमर्थ सीतामाईंचे वर्णन करतात. ही जानकी प्रभुरामचंद्रांच्या डावीकडे विराजमान आहे. सीतामाई म्हणजे आदर्श पतिव्रता, अत्यंत लावण्यवती, जनकाची सुकन्या ! ही जनकतनया म्हणजे मूळमायच ! हीच विश्वाचे कल्याण करते, स्वस्वरूपापर्यंत गजेऊन जाते, हीच विश्वाचे पालनपोषण करते म्हणून विश्वमाता ! या उभयतांच्या बाजूस महावीर लक्ष्मण उभा आहे. तसेच गदाधारी सुकुमार भरत आणि शत्रुघ्न हे दोघेसुद्धा बाजूला आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर मंद हास्य आहे आणि एकमेकांशी मधुरभाष्य करत आहेत. या भावंडांवर प्रभुरांचंद्रांचे वडिलांसारखे प्रेम आहे. त्यांच्यासमोर श्रीहनुमंत हात जोडून उभा आहे. श्रीहनुमंत हा कपिकूळाचे भूषण आहे. अशा या श्रीहनुमानाचा प्रताप काय सांगावा !! परमप्रतापी, समस्त वानरकुळाला सांभाळणारा, पर्वताप्रमाणे धिप्पाड ! समुद्र लंघून यानेच सीतामाईना शोधले होते. असा हा महापराक्रमी श्रीहनुमान की ज्याने जन्मतःच सुवर्णाची कासोटी धारण केलेली आहे. असा हा स्वतःला " प्रभुरामचंद्रांचा दास " म्हणवून घेणारा श्रीहनुमान हात जोडून विनम्रपणे उभा आहे. असे रामपंचायतानाचे सुरेख वर्णन श्रीसमर्थ करतात.