🚩|| श्री समर्थांचे लघुकाव्य सगुणध्यान ||🚩
ब्रह्म आत्मस्वरूप असल्याने स्वतःमधील आत्मवस्तूची ओळख होण्यास त्यावर झाकण आलेला स्वतःपैकी अनात्म भाग बाजूस सरला पाहिजे.
" मी देहच आहे " अशी दृढ भावना पोसणारी देहबुद्धी हा स्वतःमधील अनात्म भाग होय. देहबुद्धी बाजूस सरण्यास देहबुद्धीचाच आश्रय घेतला पाहिजे.
आपला देह सगुण म्हणून आपला देवदेखील सगुण. आपला देह जितका खरा तितका आपला देवदेखील खरा. अशी दृढ भावना ठेवून श्रद्धेने व प्रेमाने सगुणोपासना केली
तर देहबुद्धी आपोआप क्षीण होत जाते. भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्या मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो.
अशा रीतीने भगवंताच्या सगुणरूपाचे सतत चिंतन होत गेले की त्याच्या पायी अतिशय श्रद्धा जडते. निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते.
ध्यानाची पराकाष्टा झाली की दिव्य प्रेम उत्पन्न होते. प्रेमामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन घडून भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. श्रीसमर्थ यासच भक्तिमार्ग म्हणतात.
या ११९ ओव्यांचा " सगुणध्यान " या लघुकाव्यात सगुण म्हणजे नक्की काय याचा सुरेख वस्तुपाठ आपल्यासमोर ठेवतात.
वाचताना, अभ्यासताना आप अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातो. श्रीप्रभुरामचंद्र हे श्रीसमर्थांचे सद्गुरू तसेच उपास्य दैवत !
आमुचे कुळी रघुनाथ ।
रघुनाथे आमुचा परमार्थ ।
जो समर्थांचाही समर्थ ।
देवां सोडविता ।।
( दासबोध ६-७-२१)
कर्ता राम मी नव्हे आपण ।
ऐसें सगुणनिवेदन ।
निर्गुणी ते अनन्य ।
निर्गुणचि होइजे ।।
( दासबोध ६-७-३४)
माझा रघुनाथ कसा आहे आणि त्याची सगुणभक्ती केली तर तो आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जातो असे ठाम प्रतिपादन श्रीसमर्थ करतात.
प्रस्तुत लघुकाव्यात ओवी १ ते ४० मध्ये श्रीप्रभुरामचंद्राच्या सगुणमूर्तीचे साद्द्यांत आणि विस्तृत वर्णन आहे.
ओवी ४१ ते ५० मध्ये श्रीप्रभुरामचंद्र सिंहासनाधिष्ठित असता त्यांच्या दरबाराचे वर्णन आहे.
ओवी ५१ ते ७८ यामध्ये दरबारात जमलेल्या मंडळींचे आणि त्यांच्या कार्यक्रमाचे वर्णन आहे.
ओवी ७९ ते १०४ मध्ये कीर्तन, सभा, आरती यांचे वर्णन आहे. अखेरच्या ओव्यांमध्ये श्रीसमर्थ नामस्मरणाची फलश्रुती सांगतात.
असे हे " सगुणध्यान " आपल्याला सगुणवर्णन वाचून गुंगवून टाकते यात शंका नाही आणि
जणू काही आपण प्रभुरामचंद्रांच्या दरबारात उपस्थित आहोत अशी अनुभूती येते.