राम तो जाणिजे आत्मा |सर्वांतरात्मा तो चि तो |
त्रैलोक्य चालवितो तो |आतां हि रोकडा पाहा ||१||
देखवी ऐकवीतो तो |चाखवी दाखवी सदा |
बोलवी चालवीतो तो |देहपुरासी वर्तवी ||२||
कृतायुगीं त्रेतायुगीं |द्वापारीं कलयुग हें |
आद्यंत तोचि तो देवो |मायावी लाघवी पाहा ||३||
बहुदेहीं देहाकारें |वर्ततो तो दिसेचिना |
कळतो तोचि तो त्याला |जाणतो आपआपणा ||४||
कल्पितो तर्कितो नाना |सवेवांचुनी नाडळे |
ब्रह्माविष्णुमहेशादि |इन्द्रादि देव सर्व ही ||५||
योगी ऋषी मुनी ध्यानी |ध्याता ध्येय दोहिंकडे |
दानवांमानवांदीक |जीती हारि स्वयेंचि हा ||६||
वंद्य निंद्य तयावीणें |सर्वथा न घडे जनीं |
कतर्ृत्व सर्वही तेथें |येथें काय वदों पुढें ||७||
विवरी तो हरी जाणा |एकदेसी नव्हे कदा |
यात्मत्वें आत्मरूपी तो |आतां पाहेल तोचि तो ||८||
देहे धरी देहे त्यागी |नानारूपीं भरोनियां |
बाळ तारुण्य वृद्धात्मा |नर नारी नपुंसकु ||९||
कुरूपी सुंदरु जाला |पापात्मा पुण्यवंत तो |
वंद्य तो निंद्य तो जाला |नाना देहीं भरोनियां ||१०||
त्यावीण दुसरा कैचा |नाना देहे धरावया |
करावया वोखटें बर्वें |तोचि तो आपआपणा ||११||
नाना मतांतरीं वर्तें |प्रवर्ते योगसाधनीं |
भोगी त्यागी महायोगी |संयोगी योगनास्तिकु ||१२||
सुंदरु विपारा होतो |हांसतो आपआपणा |
अशक्त शक्त तो होतो |कुटितो आपआपणा ||१३||
नरनारीदेहे होतो |भोगितो आपआपणा |
जीव शिवशक्ती जाला |श्रेष्ठ मध्यस्त धाकुटा ||१४||
किडा मुंगी स्वयें होतो |तुटतो पशुच्या पदें |
हांसे रडे पडे कुंथे |सर्वही करी एकला ||१५||
देहाकारीं खबर्दारी |चोर मैंद वरपेकरी |
भला तो भक्त तो साधु |साधु भोंदु दोहिंकडे ||१६||
वंद्य तो निंद्य तो होतो |पाहतां वेगळा दिसे |
येकला येच वेळे तो |जन्मतो मरतो किती ||१७||
श्रीमंत करंटा होतो |भोग भोगी चहूंकडे |
भासतो विवेकी लोकां |दिसतो हें घडेचिना ||१८||
वळवळी चळवळी देहीं |पळतो पीटितो बळें |
मुरडतो हांसतो जातो |पडतो प्रेत होऊनी ||१९||
त्यावीण प्रेतसें होतें |नासतें देह नासकें |
कळे तोहि कळेनाहि |मुरतो अधिच्यामधें ||२०||
विचित्र करितो काया |कायामाया परोपरीं |
बोलतां चालतां येना |उदंड तो म्हणोनियां ||२१||
द्रष्टा साक्षी तिंहीं लोकीं |मुळीचा मूळ ईश्वरु |
गणेश शारदा जाला |मल्हारी क्षत्रपाळ तो ||२२||
तुळजा काळिका चंडी |लक्ष्मी तो नारायणु |
महादेव बहु शक्ती |रामकृष्णादि भार्गवु ||२३||
नाना क्षेत्रें पूज्य स्थानें |देवभक्त दोहींकडे |
प्रेमळु नाचतो गातो |किती म्हणोनि सांगणें ||२४||
सर्वही करितो तो तो |किती म्हणोनि सांगणें |
बोलिलें कळायासाठीं |रामदास जनीं वसे ||२५||